गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण

2211

– १६ लाख रूपयाचे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधर व डिव्हीसीएम संगिता याच्या आत्मसमर्पणानंतर गुरुवार २७ जून रोजी दोन जहाल महिला नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलसमोर आत्मसमर्पण केले आहे. बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २८ वर्ष), रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २९ वर्षे) रा. कटेझरी ता. धानोरा, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहे. दोघांवरही विविध गुन्हे दाखल असून १६ लाख रुपयांचे बक्षीस शासनामार्फत जाहीर होते.
शासनाने २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६६ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण १९ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पित बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे ही २०१० मध्ये गट्टा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाली. २०१० च्या शेवटी अहेरी दलममध्ये बदली होऊन ती कार्यरत होती. २०२६ मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन कार्यरत. २०२१ मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य//एरीया कमिटी सदस्य) म्हणून बढती व आजपर्यंत कार्यरत होती.
तिच्यावर आजपर्यंत एकुण २१ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक, ०१ जाळपोळ, ०१ अपहरण व ९-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके ही २०११ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत होती. २०१३ मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्र. ०४ येथे बदली. २०२१ मध्ये कंपनी क्र. ०४ मधून कंपनी १० येथे बदली. २०२३ मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) या पदावर बढती व आजपर्यंत कार्यरत होती.
तिच्यावर आजपर्यंत एकुण ०८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०६ चकमक, ०२ इतर, इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.
दोघींनीही दलममधील वरिष्ठ कॅडरचे नक्षली हे चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे असे सांगतात मात्र प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही. नक्षल दलममधील जेष्ठ नक्षल्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. वरीष्ठ नक्षली नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकीदरम्यान पुरुष नक्षली पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. गडचिरोली जिल्ह्रात तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे त्यामुळे आत्मसमर्पण केल्याचे सांगतात.
महाराष्ट्र शासनाने बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिचेवर ०८ लाख तर शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके हिचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन दोघींना ५ – ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.

सदर नक्षल्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalsurrender)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here