– घरावर दररोज गुंडांची धाड, पोलिसांना खुलं आव्हान
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीचे सगळे नियम चिरडून काढणारा एक थरारक प्रकार अहेरी तालुक्यात समोर आला आहे. यामुळे जिल्हाभरात आता खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशन रेपनपल्ली अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा येथील कुख्यात दारू तस्कर गुलाब देवगडे याने आपल्या सहकाऱ्याला मल्लमपल्लीच्या जंगलात नेऊन डोक्यावर पिस्तुल ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. केवळ दारूच्या व्यवहारातून उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची तक्रार अमोल म्हेसकर यांनी पोलिसांकडे अर्जाद्वारे केली असून सदर घडलेल्या प्रकाराची आपबिती आज पत्रकार परिषदेतून सांगितली आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि कायदायंत्रणेसमोर असलेल्या संवेदनशील जिल्ह्यात दारूबंदी असतानाही खुलेआम दारू तस्करी सुरू असून, त्यात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या आमिषाने ओढले जात आहे. अमोल म्हेसकर यांचीही अशीच गळा धरून फसवणूक करण्यात आली. म्हेसकर यांना आधी रोजंदारीवर ठेवून तस्करीच्या जाळ्यात अडकवले गेले. त्यांनी लाहेरी येथील दारू विक्रेता सोनु माटे यांच्याकडून २०० पेट्यांची दारूची ऑर्डर मिळवून दिली. मात्र या दारूमध्ये पाणी मिसळलेले असल्याने दारू विक्रेता सोनू माटे याने उर्वरित दारूची रक्कम देण्यास मनाई केली. आणि रक्कम थकल्याचा राग गुलाब देवगडे याने म्हेसकर यांच्यावर काढला.
६ एप्रिल २०२५ रोजी म्हेसकर यांना जबरदस्तीने मल्लमपल्लीच्या जंगलात नेण्यात आले. तिथे पिस्तुल लावून, “आर्डर तू आणली, आता पैसेही तूच दे” असे म्हणत मारहाण करण्यात आली. त्यानंतरही दहशत संपली नाही. गुलाब देवगडे दररोज बोलेरो गाडीतून १० ते १२ गुंडांना घेऊन म्हेसकर यांच्या आलापल्ली येथील घरी येतो आहे. हातात शस्त्रे आणि पिस्तुल घेऊन “पैसे दे, नाहीतर मारून टाकू” असे धमकावत आहे.
दारूबंदी जिल्ह्यात पोलीस यंत्रणेला धता देत, खुलेआम शस्त्र घेऊन लोकांच्या घरी दहशत माजवली जात असल्याची ही घटना अत्यंत गंभीर आहे. म्हेसकर यांचे संपूर्ण कुटुंब आज दहशतीखाली जगत आहे. “माझा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही, तरीही माझं आयुष्य नरक बनलंय. माझं आणि कुटुंबाचं रक्षण करा,” असा टाहो म्हेसकर यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांना दिलेल्या अर्जात, पत्रकार परिषदेत फोडला.
या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि शासन काय कठोर पावलं उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #aheri