गडचिरोली : पोर्ला जंगल परिसरातील ‘त्या’ मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

7816

– २४ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या पोर्ला येथील वडधा मार्गावरील जंगल परिसरात २१ डिसेंबरला एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. मात्र अवघ्या २४ तासात स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा पर्दाफाश करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. निखिल मोहुर्ले, रा. वैरागड असे आरोपीचे नाव आहे.

पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांनी त्यांचे सदर परिसरातील त्याचप्रमाणे संपुर्ण गडचिरोली व गडचिरोली लगत जिल्ह्यातील त्यांचे बातमीदारांना कार्यान्वीत करून माहिती घेत असतांना एक मुलगी वय अंदाजे १९ वर्ष, रा. चंद्रपूर ही २० डिसेंबर २०२३ रोजी पासून चंद्रपूर येथून बेपत्ता आहे अशी माहिती गडचिरोली शहरातील एका गोपनिय बातमीदाराने दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद बद्दल माहिती मिळाली. त्यावरून तात्काळ मुलीचे नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली. संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोनासोबत होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहुर्ले, रा. वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहुर्ले मुल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुर्ले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निखील मोहुर्ले यांस पुढील तपासकामी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतिष कत्तीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here