– वाघांच्या शिकारीत वाढ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढताना दिसत असून नुकतेच गुप्त माहीतीच्या आधारे महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभाग यांच्या संयुक्त चमुव्दारे एटापल्ली ते जिवनगटटा मार्गावर वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले आहे. सदर कारवाई २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३.०० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शामराव रमेश नरोटे (वय ३०) रा. वासामुंडी व अमजद खॉ अमीर खॉ पठाण (वय ३७) रा. एटापल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान आरोपीकडून वाघाची कातडी १ नग, हिरोहोंडा कंपनीची एक दुचाकी वाहन, तीन मोबाईल फोन असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.दोन्ही आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ए ४९, बी ५० अन्वये वनगुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात वाघांच्या शिकारीचे प्रकरण यापूर्वीही उजेडात आले आहे. जिल्ह्यात वाघाची संख्या वाढल्याने व मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने शिकारी याचाच फायदा घेत वन्यप्राण्यांची शिकार करीत आहे. जिल्ह्यात वाघांच्या शिकारीमध्ये वाढ होताना दिसत आहे.
सदर कारवाई गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागड वनविभागाचे उप वनसंरक्षक शैलेश मीणा व उदंती सितानदी टायगर रिजर्व छत्तीसगड वनविभाग, उप निदेशक वरूण जैन व चमू यांचेव्दारे संयुक्तरित्या करण्यात आली. प्रकरचा पुढील तपास अशोक पवार सहायक वनसंरक्षक भामरागड़ यांचेमार्फत सुरू आहे.