– १७० आत्मसमर्पित माओवादी देखिल बजावणार आपला मतदानाचा हक्क
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : जिल्ह्रात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०४ च्या अनुषंगाने ६८- गडचिरोली, ६९-अहेरी व ६७-आरमोरी विधानसभा मतदार संघाकरीता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने माओवादी हे सुरक्षा दलाच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करणे, स्फोट घडवून आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे इ. देशविघातक कृत्य करीत असतात. या निवडणूकीच्या अनुषंगाने सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणेे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.
ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/ राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या (सि.ए.पी.एफ/एस.ए.पी.एफ) 111 कंपनी तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक व पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणाहून एकुण ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक ७०० च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकुण १६ हजारच्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्रातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासोबतच जिल्ह्रातील ३६७ अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून सी-६०/ सिआरपीएफ – क्यु.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या ३६ तुकड्यांमार्फत जिल्ह्रातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
यासोबतच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखिल सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह सुसज्ज ड्रोन टीम ही जमिनीवरील सैंन्यांसाठी आकाशात डोळा म्हणून काम करेल तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी ०५ अँटी ड्रोन गन देखिल सज्ज राहतील. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणाया मार्गावर डी.एस.एम.डी./व्हेईकल माऊंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करुन सुमारे ७५० कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे ०३ – एम.आय. १७ व भारतीय लष्कराचे २ – ए.एल.एच असे एकुण ०५ हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या ०२ हेलीकॉप्टरसह एकुण ०७ हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागात व तेलंगणा आणि छत्तीसगडच्या लगतच्या जिल्ह्रांच्या मदतीने निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
यासोबतच कालपासून भारतीय वायुसेनेच्या एम.आय १७ हेलीकॉप्टरच्या मदतीने १५३ मतदान केंद्रावरील ६५० मतदान कर्मचायांना मतदान केंद्रावर पाठविण्यात आले असून १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उर्वरीत ५८ मतदान केंद्रावर ईव्हीएम व मतदान कर्मचाऱ्यांना पाठविण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे. निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता बंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नव्हते. त्यामुळे टपाली मतदानाद्वारे गडचिरोली पोलीसांमार्फत एकुण २९७९ टपाली मतदान करण्यात आले आहे. यासोबतच १७० आत्मसमर्पित माओवादी हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ करिता मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक ही शांततापूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, विविध राज्यातील पोलीस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलीस दल, गृह रक्षक दल हे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchiroliforest #gadchirolicollector #election2024 )