गडचिरोली : ‘त्या’ चकमकीतील ठार झालेल्या दुसऱ्या नक्षलीची ओळख पटली

1518
File Photo

– ठार झालेल्या नक्षलींवर १० लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : जिल्हयातील उपविभाग पेंढरी (कारवाफा) अंतर्गत पोमकें गोडलवाही पासुन १० कि.मी. अंतरावर असलेल्या बोधीनटोला जंगल परिसरात काल १४ डिसेंबर रोजी पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षली ठार झाले. त्यात २०१९ च्या जांभुळखेडा स्फोटातील मुख्य सूत्रधार कसनसुर दलमचा उपकमांडर दुर्गेश ऊर्फ दल्लु बंडु वट्टी (वय ३६ वर्ष) रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली यासह एकाचा समावेश होता. दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. आज सदर मृतक नक्षलीची ओळख पटली असून राकेश रा. बस्तर (छत्तीसगड) अशी आहे. महाराष्ट्र शासनाने दुर्गेश वट्टी वर ०८ लाख रुपयांचे तर राकेश वर ०२ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगत असलेल्या मोहल्ला मानापुर जिल्हापासुन जवळ आणि गडचिरोली जिल्हयातील उपविभाग पेंढरी (कारवाफा) अंतर्गत पोमकें गोडलवाही पासुन १० कि.मी. अंतरावर असलेल्या बोधीनटोला जंगल परिसरात माओवादी मोठ्या प्रमाणात घातपात करण्याच्या तसेच पोलीसांचा खबरी असल्याचा संशयावरुन निष्पाप आदिवासींना मारण्याचा उद्देशाने तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान च सीआरपीएफच्या क्यु.ए.टी चे जवान सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबवित असतांना काल १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १४.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणेबाबत आवाहन केले असता नक्षल्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ०१ तास चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०२ पुरुष नक्षल मृतावस्थेत आढळले. त्यामध्ये कसनसुर दलमचा उपकमांडर नामे दुर्गेश ऊर्फ दल्लु बंडु वट्टी (वय ३६) रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली व राकेश रा. बस्तर (छत्तीसगड) याचा समावेश होता. मृतक नक्षली दुर्गेश ऊर्फ दल्लु बंडु वट्टी हा सन २०१९ मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सुत्रधार होता ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ पोलीस जवान शहिद झाले होते. तसेच घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आलेली एके ४७ रायफल ही सन २०१२ साली मौजा गट्टा (फु.) येथे माओवाद्यांच्या अॅक्शन टीममार्फत करण्यात आलेल्या हल्यात शहिद जवान आर. आर. पांडे, एसआरपीएफ बल गट क्र. ४ नागपूर या जवानाची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दुर्गेश हा सन २००३ साली गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होवुन २०१० पर्यंत भामरागड, पेरमीली व सिरोंचा या दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर २०१० ते २०१२ साली कंपनी १० मध्ये उपकमांडर चा अंगरक्षक म्हणून काम केले. सन २०१४ साली पदोन्नती होवुन उत्तर व दक्षिण गडचिरोली भागात उपकमांडर म्हणुन काम पाहिले. तसेच सन २०१७ ते २०२१ दरम्यान कंपनी ०४ मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत राहुन सन २०२२ पासुन कसनसुर दलमचा उपकमांडर म्हणुन काम करत होता. त्याच्यावर चकमक १८, खुन-०३, खुणाचा प्रयत्न ०३, जाळपोळ ०२, पोलीस खुण ०१ व इतर – ०६ असे एकुण ३३ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण ०८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर राकेश हा छत्तीसगड राज्यातील बस्तर येथिल रहिवासी असून, त्याच्यावर चकमक ०१ व इतर ०१ असे एकुण ०२ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यासोबतच घटनास्थळावर ०१ नग ए के -४७ रायफल, ०१ नग एसएलआर रायफल, ०२ नग वॉकीटॉकी, ०२ नग वॉकी टॉकी बॅटरी, ०२ नग टॉर्च, औषधी व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास व सिआरपीएफच्या क्यु.ए.टी पथकास यश आले आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., डीआयजी (अभियान) सिआरपीएफ श्री. जगदीश मीना सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० व सिआरपीएफच्या क्यु.ए.टी जवानांच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच सदर भागात माओवाद विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

(the gadvishva, the gdv, gadchiroli police, godalwahi, naxal, sp nilotpal, jambhulkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here