The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : शेतात धान रोवणी करून घरी चहा बनवायला परतला आणि गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना अमिर्झा नजीकच्या चांभार्डा येथे २७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मिथून काशिनाथ बावणे (२८) रा. चांभार्डा असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र धान रोवणीचा हंगाम सुरू आहे. बावणे याच्या शेतातही रोवणीचे काम सुरू होते. दरम्यान २७ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मिथुन हा घरी चहा बनविण्यासाठी आला. परंतु तो अर्धा तास लोटूनही परत न आल्याने वडील काशिनाथ बावणे हे घरी आले. घरामध्ये त्यांनी पाहिले असता मिथुन हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. लागलीच त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक गोळा झाले. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदननासाठी ताब्यात घेतला. मिथुन ने गळफास का घेतला हे मात्र कळू शकले नाही. त्याच्या अशा मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.