गडचिरोली : दोन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण, १८ लाखांचे बक्षीस होते जाहीर

1212

– एक डीव्हीसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्याचा समावेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : टीसीओसी कालावधी दरम्यान चकमक, जाळपोळ व इतर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या एका डी.व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याने गडचिरोली पोलिस व सिआरपीएफ समोर आज २७ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले आहे. कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो, (डी.व्हि.सी.एम सप्लाय टीम), (वय ५६) रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम), (वय ३०) वर्षे, रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे.
शासनाने २००५पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ७०२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हीने 1993 मध्ये मद्देड दलममध्ये भरती होवून 1995 पर्यंत काम केले. 1995 ते 1998 पर्यंत उत्तर गडचिरोलीतील प्लाटुन क्र. 02 मध्ये सदस्य पदावर काम केले. 1998 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2001 पर्यंत सदस्य पदावर काम, 2001 मध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये सन 2003 पर्यंत काम, 2003 मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन 2006 पर्यंत उप-कमांडर पदावर काम, 2006 मध्ये एसीएम (Area Committee Member)पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये 2008 पर्यंत काम, 2008 मध्ये डिव्हीसीएम (Divisional Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड, चातगाव व कसनसुर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये 2015 पर्यंत काम केले, 2015 मध्ये माड एरीयामध्ये स्टाफ/सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपावेतो काम केले.
हिच्यावर आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 07 चकमक, 01 जाळपोळ व 03 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी हा 2021 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर 2024 पर्यंत काम केले. सप्टेंबर 2024 मध्ये डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून आजपावेतो काम केले. याच्यावर 01 चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्हयांत त्याच्या सहभागाची पडताळणी सुरु आहे.
महाराष्ट्र शासनाने कांता पल्लो हिच्यावर 16 लाख तर सुरेश मज्जी याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून कांता पल्लो हिला एकुण 8.5 लाख रुपये सुरेश मज्जी याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 22 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व परविंदर सिंग, कमांडंट 192 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here