– शेतकऱ्यांचे पिके केले उद्ध्वस्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : ओडिशाहून जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात बस्तान मांडले आहेत. दरम्यान शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी या रानटी हत्तींचा कळपाने गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी, कृपाळा, मुडझा, मसली या गावांमध्ये धुमाकूळ घालततीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखेडे (४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत. परिस्थिती गंभीर असल्याने यातील एकीला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
कृपाळा येथील नदी काठावर काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या यावेळी रानटी हत्तींचा कळप त्याठिकाणी दाखला झाला असता धांदल उडाली, दरम्यान महिला त्या ठिकाणावरून सैरावैरा पळू लागल्या मात्र अचानक झालेल्या हल्ल्याने सुशीला मेश्राम या महिलेला हत्तीची धडक लागल्याने तिला मुका मार लागला. तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. तर अन्य दोघी जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हत्तींनी महिलांवर हल्ला केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांवरही प्रचंड आक्रमण केले. वाकडी येथील माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या तीन एकर शेतातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय, हिरापूर आणि म्हसली येथील शेतकऱ्यांच्या शेड्स आणि पिकांचे नुकसान हत्तींनी केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
हत्तींविरोधी उपाययोजना न केल्याबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. “हत्तींमुळे आमचं जीवन धोक्यात आहे. प्रशासनाने यावर त्वरित नियंत्रण ठेवावे, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होईल,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाकडून हत्तींच्या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवण्याची मागणी केली जात आहे.
