गडचिरोली : नदीपात्रात उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलीसांनी वाचवले प्राण

222

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जिल्ह्यातील भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठडयावरुन भामरागड मधील एका महिलेने नदीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला असता जलद प्रतिसाद पथक, भामरागड (क्युआरटी) च्या जवानांनी सदर महिलेचे प्राण वाचविले.
२२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास भामरागड येथील एक महिला पर्लकोटा नदी पुलाच्या सुरक्षा कठडयावरुन नदीपात्रात उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, त्यामुळे तेथील नागरिकांनी तात्काळ जलद प्रतिसाद पथक, भामरागड (क्युआरटी) च्या जवानांशी संपर्क केला. क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली क्युआरटी भामरागडच्या जवानांची एक छोटी तुकडी तात्काळ त्याठिकाणी मदतीस पोहचली व सदर महिलेस वाहत्या पाण्यातुन बाहेर काढले, महिला घाबरलेल्या व अस्वस्थ परिस्थिीतीत असल्यामुळे क्युआरटीच्या जवानांनी त्वरीत ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे संपर्क करुन रुग्णवाहिका बोलावून सदर महिलेस उपचाराकरीता रुग्णालयात भरती केले.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात नापोअं योगेंद्र सेडमेक, पोअं संपत गंड्राकोटा, पोअं शंकर हबका व पोअं सुरेश कुडयेटी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व कायदा व सुव्यवस्था राखणे याच बरोबर समाजाशी आपुलकीचे नाते जपत पोलीसांनी दाखविलेल्या या साहसी कार्याचे कौतुक भामरागड येथील नागरीकांनी केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchiroli local news #gadchirolipolice)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here