The गडविश्व
गडचिरोली दि. ३० : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या नावे बँक खाते काढणे प्रलंबित असल्यास त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करून स्पर्धेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे.
काही गणेशोत्सव मंडळांकडे बँक खाते, पॅन कार्ड व धनादेश नसल्यामुळे त्यांना स्पर्धेकरिता अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सदर अट शिथिल करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मंडळाच्या कार्यात अधिकृतता आणि वित्तीय नियमीतता असावी यासाठी मंडळाच्या नावे बँक खाते व पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तथापि ज्या मंडळाचे नावे बँक खाते व पॅन कार्ड काढणे प्रलंबित आहे त्यांनी सर्व विश्वस्तांच्या संमतीचे प्रतिज्ञापत्र तयार करून अर्जासोबत जोडल्यास अर्ज ग्राह्य धरण्याच्या सूचना अकादमीकडून प्राप्त झाल्या आहेत. प्रतिज्ञापत्रात “आमच्या मंडळाच्या नावे बँक खाते व पॅन कार्ड प्रलंबित असल्याने आम्ही संस्थेतील अध्यक्ष / सचिव यांच्या नावे असलेल्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील सादर करीत आहोत. स्पर्धेच्या पारितोषिकासाठी आमच्या संस्थेचा विचार केला गेल्यास, वरील बँक खाते आमच्या संस्थेसाठी ग्राह्य धरावे. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बँक खात्याचा दावा, मिळणारी बक्षिस रक्कम जमा करण्यासाठी मंडळाकडून अकादमीकडे / शासनाकडे करण्यात येणार नाही. तसेच बँक खात्यासंदर्भात व संस्थेशी निगडीत कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जाबाबदारी संस्थेची राहील.”अश्या पध्दतीचे नोटरीकृत प्रतिज्ञापत्र प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारण्यास हरकत नसल्याचे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी कळविले असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव श्रीराम पाचखेडे यांनी कळविले आहे.