– जन अधिकार मंचची विद्यापीठाकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या मणिपूर राज्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी शहरातील जन अधिकार मंच या सामाजिक संघटनेने येथील गोंडवाना विद्यापीठाकडे केली आहे.
यासंदर्भात मंचच्या शिष्टमंडळाने सामाजिक कार्यकर्ते व मंचाचे मुख्य निमंत्रक रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांची भेट घेऊन त्यांना या विषयावर निवेदन दिले.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आपली घरे सोडली आहेत आणि ते विस्थापित झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे जे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. हे नुकसान राष्ट्रीय नुकसान असल्याने तातडीने भरपाई मिळणे आवश्यक आहे असे निवेदनात नमूद करून काही विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासी सुविधांसह गोंडवाना विद्यापीठात सामावून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
त्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखान यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. याप्रकरणी विद्यापीठाच् कुलगुरू आणि इतर वैधानिक मंडळांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिले.
ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुम आलम, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप बारसागडे, विलास निंभोरकर, उपेंद्र रोहणकर, सुनीता उसेंडी आदी या शिष्टमंडळात उपस्थित होते.