-शाळा कार्यक्रमातंर्गत विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : नुसते उपदेश देऊन होणार नाही, विद्यार्थी व शिक्षक मिळून तंबाखूमुक्तीसाठी शाळांमध्ये कृती होणे आवश्यक आहे. केलेल्या गोष्टी विद्यार्थी विसरत नाही. म्हणून सर्व शाळांनी तंबाखूमुक्त शाळा निर्मिती करिता कृतीवर अधिक भर द्यावा व त्यासोबत तंबाखू दुष्परिनामाच्या माहितीची लस विद्यार्थ्यांना द्यावी, असे अध्यक्षीय भाषणात डॉ. अभय बंग यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
तंबाखूला नाही म्हणा, तंबाखू किंवा दारूची सुरवातच करू नका, धोके काय आहे इत्यादि माहिती विद्यार्थ्यांना वारंवार दिली पाहिजे. व्यसनाला नाही म्हणण्याचा संदेश विद्यार्थ्याकडून पालकांपर्यन्त गेला पाहिजे. पालकांकडून व घराघरातून महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकीय नेत्यांना संदेश गेला पाहिजे की, व्यसनाचा व्यापार करून निवडून येऊ नका हा नैतिक गुन्हा आहे असे ही बोलतांना पुढे ते म्हणाले. 8 ऑक्टोबर रोजी स्थानिक आदिवासी गोंडवाना कला दालन केंद्र गडचिरोली येथे मुक्तिपथ तर्फे जिल्हाभरातील 302 शाळांमध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धा व विचार कार्यक्रम अंतर्गत विजेत्या शाळांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग तसेच जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नाकाडे यांच्या हस्ते विजेत्या शाळांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सोबतच मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर यावेळी उपस्थित होते. शिक्षकांनी प्रमुख जबाबदारी समजून शाळा तंबाखूमुक्ती साठी प्रयत्न केले पाहीजे तसेच पालकांमध्ये अधिक जागृती याबाबत केली पाहिजे असे नाकाडे आपल्या मार्गदर्शनात संगितले.
शाळा पातळीला प्रश्नमंजुषा स्पर्धा, क्लस्टर स्तरावर पथनाट्य स्पर्धा तर तालुकास्तरावर तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी उपाययोजनेसाठी प्रकल्प तयार करणे अशा तीन स्तरावर कृतीयुक्त उपक्रम घेऊन वीजेत्या शाळा निवडन्यात आल्या. याअंतर्गत व्यसनाचे प्रकार, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांना व्यसनापासून कसे दूर करणार? काय पद्धती वापरणार,कोणती कृती करणार या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्तम पोस्टर सादरीकरण केले. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या अशा एकूण 22 शाळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून आलेल्या अनुभवाचे कथन केले. सोबतच व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्यसनमुक्त गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करीत मुक्तिपथच्या सहकार्याने तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी झाल्याने शिक्षकांनी मुक्तिपथ चे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सावळकर तर संचालन वडसा मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये व आभार तालुका संघटक रूपेश अंबादे यांनी मानले. या प्रसंगी विजेत्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुक्तिपथ संघटक उपस्थित होते.
तंबाखू, खर्रा गांजा, ड्रग्ज पेक्षा हानीकारक : डॉ. बंग
शाळेच्या आतील व बाहेरील संपूर्ण परिसर दारू व तंबाखूमुक्त असेल तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडतात. गडचिरोली जिल्ह्यात तोंडाच्या कॅन्सर चे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आई- वडिलांनी सुद्धा आपण व्यसनमुक्त राहून आपल्या मुलांना कॅन्सर पासून वाचवावे. तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटिन कोकिन, ड्रग्ज पेक्षाही लवकर व्यसन निर्माण करतो. आयुष्यभर व्यसनमुक्त राहा असे आवाहन सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
स्पर्धेत यशस्वी 22 शाळा
देसाईगंज तालुक्यातील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक शिवाजी विद्यालय तुळसी आरमोरी तालुक्यातील पॅराडाइ इंग्लिश मिडियम स्कूल व वत्सलाबाई वनमाळी स्कूल कुरखेडातील ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळा व आंचिव हायस्कूल चिखली, कोरचीतील श्रीराम विद्यालय, युवस्पंदन विद्यालय भीमपुर,धानोरातील राजे लालशहा मदवि विद्यालय कारवाफा व प्रीयदर्शनी विद्यालय, गडचिरोलीतील कर्मवीर विद्यालय अमिर्झा व महात्मा गांधी विद्यालय नवेगांव चामोर्शी इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कंडादेव, मूलचेरा भगवंतराव आश्रमशाळा लगाम व राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल, एटापल्लीतील कस्तुरबा गांधी विद्यालय व जिल्हा परिषद प्रा. शाळा पंदेवाही अहेरीतील स्वर्गीय विमलताई ओलालवार हायस्कूल बोरी व धर्मराव हायस्कूल आलापल्ली सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरडा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोयाबीनपेठा पटकाविला आहे. या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )