– अन्याय झाल्यास हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्याचा शेकापचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात भूमीहीन व अल्पभूधारक असलेला आणि पारंपारीक मच्छीमार समाज असलेल्या ढिवर, केवट, भोई समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज आजही नदी, तलाव, बोळीत पारंपारीक पध्दतीने मासेमारी करुन आपली उपजिविका करीत आहे. मात्र सध्या अनेक तलावांची निविदा प्रक्रीयेव्दारे व्यापाऱ्यांना तलाव देण्यात येत आहेत. यामुळे पारंपारीक मच्छिमार समाजांचे हक्क हिरावले जात असून जिल्ह्यातील तलाव मच्छीमारी करीता ढिवर, केवट, भोई समाजाला मिळाले नाही तर हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात महसूल, पाटबंधारे, जिल्हा परिषद आणि पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती मच्छीपालन आणि मासेमारी करीता खुल्या निविदा प्रक्रीया राबवत असल्याने आर्थिक सक्षम व्यावसायीकांना हे तलाव मिळतात. त्यामुळे ढिवर, केवट, भोई समाजाच्या पारंपारीक रोजगारावर गदा येत आहे. पेसा क्षेत्राकरीता तलाव लिलावासंबंधातील महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय २ ऑगस्ट २०१४ चे मार्गदर्शक सूचना बाब क्रमांक ३ चे पालन होवून ढिवर, केवट, भोई समाजाचे पारंपारीक अधिकार आणि मासेमारीचे हक्क अबाधित राखणे गरजेचे असल्याचेही या निवेदनाद्वारे लक्षात आणून देण्यात आले आहे.
करीता गडचिरोली जिल्ह्यातील पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रातील सर्व जलाशये, तलाव, बोळीत मच्छीपालन आणि मच्छीमारीचे सर्व कंत्राट, निविदा या प्राधान्याने ढिवर, केवट, भोई या पारंपारीक मच्छीमार किंवा त्यांच्या मच्छीमार सहकारी संस्था यांनाच देण्याबाबतचे आदेश महसूल, पाटबंधारे, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना आपल्या स्तरावरुन तातडीने देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यात कोणत्याही स्थितीत तलाव लिलाव प्रक्रीयेत पारंपारीक मच्छीमार आणि त्यांच्या संस्थांना डावलून मासेमारीचा पारंपारीक रोजगार हिरावल्याचे प्रकरण घडल्यास हजारोंच्या संख्येने मच्छीमार बांधवांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांनी दिला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #shekap #shetkarikamgarpaksh )