आयात शुल्क कपातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची हमी द्या

47

– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी
The गडविश्व
दिल्ली, दि. ०१ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी १ एप्रिल २०२५ रोजी लोकसभेत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कपातीच्या संभाव्य निर्णयावर सरकारला जाब विचारला. त्यांनी सरकारकडे स्पष्टता मागितली की, कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खात्री सरकार देणार आहे का?
खासदार किरसान यांनी सभागृहात सांगितले की, सध्या भारतात कृषी उत्पादनांवर सरासरी ३९% आयात शुल्क आकारले जाते. २०२३ मध्ये सरकारने हे शुल्क कमी करण्याचे मान्य केले होते. अशा परिस्थितीत आयात शुल्क कपात झाल्यास परदेशी उत्पादने भारतीय बाजारात स्वस्त दरात येऊ शकतात, ज्यामुळे भारतीय शेतकरी अडचणीत येऊ शकतात.
ते म्हणाले की, देशातील शेतकरी आधीच हमीभावाच्या अभावामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी आयात शुल्क कपात केल्याने परदेशी उत्पादनांना अधिक संधी मिळेल आणि स्थानिक उत्पादनांवर परिणाम होईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
यासंदर्भात सरकारने कोणते ठोस उपाय योजले आहेत, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी धोरण आखावे, अशी ठाम मागणी खासदार किरसान यांनी संसदेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here