The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गडचिरोलीतील कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) चे अधीक्षक दिलीप मेश्राम यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा संस्मरणीय ठरला. जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बॅग्गीतून मिरवणूक काढून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला.
गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघाने आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोरेश्वर वासेकर, राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे कार्याध्यक्ष शमशेर खाँ पठाण आणि अबुझमाड शिक्षण मंडळाच्या सचिव स्मिताताई लडके यांची उपस्थिती लाभली.
शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी आपल्या भाषणात दिलीप मेश्राम यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले, “गडचिरोलीत अशा प्रकारचा सन्मान पहिल्यांदाच होत आहे. त्यांच्या निष्ठेने आणि कर्तव्यदक्षतेने ही प्रतिष्ठा मिळवली आहे.”
आमदार सुधाकरराव अडबाले म्हणाले, “दिलीप मेश्राम हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत ज्यांच्यासाठी शिक्षकेत्तर संघटनेने भव्य मिरवणूक काढली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडले.”
प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी सांगितले, “प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकारी म्हणून दिलीप मेश्राम यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखले. त्यांच्या कार्याचा आदर्श भविष्यातही प्रेरणादायी ठरेल.”
कार्यक्रमात वासुदेव भुसे, मोरेश्वर वासेकर, शमशेर खाँ पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते आणि विविध संघटनांनी दिलीप मेश्राम यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते यांनी केले, तर आभार संदीप भरणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदलाल लाडे, संघमित्रा भशारकर, ऋषी वासेकर, शैलेश कापकर, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, हेमंत रामटेके आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews )