–चोप येथे दारूबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : देसाईगंज तालुक्यातील चोप येथे अवैध दारूविक्री बंदीसाठी महिला सक्रिय झाल्या असून पूर्वी झालेल्या दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महिलांनी दारूविक्रेत्यांचे घर गाठून दारूविक्री कायमची बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
चोप गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सभा घेऊन विविध ठराव पारित करण्यात आले होते. तसेच निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री सुरूच ठेवल्यास पहिला दंड ५ हजार, दुसरा दंड १० हजार तसेच दंडाची रक्कम न दिल्यास तेवढ्या किमतीची वस्तू जप्ती पंचनामा करण्याचे ठरविण्यात आले होते. तरीसुद्धा काही मुजोर दारूविक्रेत्यानी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. ही बाब उघडकीय येताच महिलांनी अहिंसक कृती करीत दारूविक्रेत्याना धडा शिकवला. आता गावातील अवैध दारूविक्री बंद आहे. ही बंदी टिकवून ठेवण्यासाठी गावात पुन्हा मुक्तिपथ, तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत गावातील अवैध दारूविक्री संबंधित सध्यस्थितीवर चर्चा करून काही दिवसांपूर्वी पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महिलांची नवीन संघटना गठीत करण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी करीत गावातील महिलांनी दारू विक्रेत्यांचे घर गाठून अवैध व्यवसाय करू नका अन्यथा ठरलेल्या दंडाची रक्कम दुप्पट पटीने वसूल करण्यासोबतच शासकीय दाखले बंद करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे दारूविक्री सूरु असल्याने बंदी असलेल्या नजीकच्या गावातील लोक सदर गावात जाऊन दारूचे व्यसन करतात. त्यामुळे कोरेगाव येथील दारूविक्री बंद करण्याची मागणी केली जात आहे. गावातील दारुबंदीसाठी महिला रोज गावात फेरी मारून विक्रेत्यांवर नजर ठेवत आहेत. यावेळी गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष स्वप्नील भोयर, सरपंच नितीन लाडे, बचत गट icrp प्रीती लाडे, मुक्तीपथ तालुका संघटीका भारती उपाध्याय, राजेश रजोले यांच्यासह ५० हुन अधिक महिलांची उपस्थिती होती.
(#thegdv #thegadvishva #muktipath #gadchirolinews )