लोकसहभागातून अवैध दारूला केले हद्दपार ; नवरगावात दारूबंदी कायम

138

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : तालुक्यातील नवरगाव येथील दारूविक्रेत्यांवर पोलिस विभाग, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करून गावाला अवैध दारूविक्रीतून मुक्त केले आहे. ही दारूबंदी लोकसहभागातून लागू झाली असून मागील तीन वर्षांपासून गावातून अवैध दारू हद्दपार आहे.
गडचिरोली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर वसलेल्या नवरगावात ग्रामस्थांनी २०१९ पासुन दारुबंदी करून टिकवुन ठेवली होती. परंतु, निवडणुकिच्या काळात ५ ते ६ दारु विक्रेते इतर गावाहून आणलेली अवैध दारू विक्री करू लागले. सायंकाळी हा व्यवसाय सुरू व्हायचा. अशातच पोलिस विभागाच्या मदतीने ४ दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. तरी सुद्धा मूजोर विक्रेते जुमानत नव्हते. या गावातील दारूबंदी टिकवण्यासाठी मुक्तीपथने गावात जाऊन लोकांशी संवाद साधला. दारुबंदीचे महत्व पटवून दिले. गावात पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत गाव सभा घेण्यात आली. गावातील प्रतिष्टीत नागरिक योगेंद्र मोडक, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला व युवकांच्या पुढाकारातुन पुन्हा गाव संघटना सक्रिय करण्यात आली. त्यांनतर दारू विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. घरांची तपासणी करण्यात आली. जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारूविक्रेत्यांचे अड्डे व साहित्य नष्ट करण्यात आले. यासाठी गावकऱ्यांनी एकी दाखविल्याने अवैध दारूविक्री बंद झाली आहे. आता तीन वर्षांपासून ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटनेचे प्रयत्न सुरूच असून गावात शांतता व सुव्यवस्था टिकून आहे. या गावाने लोकसहभागातून दारुबंदी लागू केली असून इतरही गावांनी आदर्श घेण्याची गरज आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here