निमगावात शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीतून वन्यजीवांबद्दल केली जनजागृती

195

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निमगाव येथे वनक्षेत्र सहायक कार्यालय रांगी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगावच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त प्रभातफेरी काढून फलक लेखनातून वन्य जीवांचे महत्त्व सांगत वन्यजीवा बाबत जनजागृती विद्यार्थ्यांनी केली.
दरवर्षी वनविभागाच्या वतीने १ आक्टोबर ते ८ आक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येते. त्याच निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव केंद्र रांगी पंचायत समिती धानोरा येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभाग व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढून व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वन्य प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. वन आणि वन्यजीव कसे महत्वाचे आहे आणि त्यांचे मनुष्यावर होणारे परिणाम मुलामुलींना सांगितले. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संगोपन व संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रामगुंडावार आर.एफ.ओ रांगी, कोहळे वनरक्षक निमगाव, कोडाप वनरक्षक निमणवाडा यांनी सुद्धा वन्य प्राण्यांचे संरक्षण, जंगल संरक्षण, जंगल सुरक्षा कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी वन्यजीव सप्ताह संरक्षण शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सौ. बोरकर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक रमेश काळबांधे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका कु नाकाडे, कोल्हे, कुमारी संगीता तलवारकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here