– जिल्हा समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी संजय दैने यांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात २७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.४० ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मागील बैठकीचा अनुपालन आढावा घेत संबधित विभागांना दारू व तंबाखू नियंत्रणासाठी नियोजन करून कायद्यानुसार कृती व दंड करण्याचे आदेश दिले.
या बैठकीला मा.जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके मॅडम, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या सल्लागार डॉ. कुथे, जिप. आरोग्य विभाग डॉ. गोरे, आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाचे पोरेड्डीवार, पोलीस विभाग एलसीबीचे उल्हास भुसारी, अन्न व औषध विभागाचे सुरेश तोरेम इत्यादी प्रमुख अधिकारीसह इतर विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मागील बैठकीचा कार्यवृत्तांत व अनुपालन अहवालाचे वाचन श्रीमती किलनाके मॅडम यांनी केले. तसेच मुक्तिपथ अभियानाचे झालेले कामे व प्रमुख यश याबाबत प्रभारी संचालक संतोष सावळकर यांनी सादरीकरण केले. अहवालातील मुद्द्यानुसार आढावा घेत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी उपस्थित विभागप्रमुख व प्रतिनिधी यांना आवश्यक सूचना दिल्या. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे. ज्या शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूविक्री केंद्र, पानठेले आहे, ते शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापकाने हटविले पाहिजे. जिथे समस्या सुटत नाही त्या ठिकाणी पोलीस तक्रार करून ते हटविले पाहिजे. तंबाखूमुक्त शाळेच्या निकषांचे पालन सर्व शाळेने केले पाहिजे. शाळा परिसरात शालेय वेळेत व्यसन करतांना आढळल्यास सदर नोडल ऑफिसरने, समितीने कोट्पा कायद्यानुसार त्या व्यक्तीला दंड करावा. तालुका समिती बैठक संबधित तहसीलदार सोबत चर्चेद्वारे नियोजन करून पूर्ण कराव्या, अवैध दारू, तंबाखू नियंत्रण करिता ठरलेल्या निर्णयावर कृती करावी. सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त असावे, यासाठी नेमलेल्या नोडल ऑफिसरने व कार्यालय प्रमुखाने त्या त्या कार्यालयात अंलबजावणी करावी, नियमानुसार दंड करावे. सोबतच एसटी बसेस मध्ये कुणीही खर्रा किंवा तंबाखूपदार्थ खाऊन बसत असल्यास, थुंकत असल्यास सार्वजनिक मालमत्तेचे ते विद्रूपिकरण होते, इतर निर्व्यसनी व्यक्तीला त्रास होतो. अशा व्यसन करणाऱ्या व्यक्तीला मनाई करावी, आवश्यक ठिकाणी दंड करावा. सर्व बसेस मध्ये जागृती व प्रतिबांधा करिता नियमांचे छोटे फलक लावावे. एस. टी. महामंडळ चालक वाहक यांनी दारू, तंबाखू खर्राचे व्यसन करू नये. आगार व्यवस्थापक द्वारा चालक वाहक व कर्मचारी करिता एक कार्यशाळा यासाठी आयोजित करावी. तसेच स्थापन केलेल्या मुक्तिपथ ग्राम पंचायत समितीने अवैध दारू व तंबाखू नियंत्रण करिता कायदेशीर पद्धतीने ग्राम पंचायत पातळीला, गावात कृती करावी. सदर अहवाल ग्राम पंचायत नुसार बिडीओ यांनी सीइओ जिप. यांना सादर करावा. अन्न औषध विभागाने सुगंधित तंबाखू विक्री विक्रेत्यावर कारवाया कराव्या, वाढवाव्या. इत्यादी प्रकारचे कडक निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी यावेळी संबधित विभागांना देऊन त्वरित कृती करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांचे परवानगिने बैठकीची सांगता करण्यात आली. या बैठकीला मुक्तिपथचे श्री कमलकिशोर खोब्रागडे, शिक्षण विभागाचे अमरसिंग गेडाम व विवेक नाकाडे, फाल्गुन राखेडे आगार व्यवस्थापक गडचिरोली, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या मीना दिवटे व दिनेश खोरगडे इत्यादी विविध विभागप्रमुख तसेच प्रतिनिधी बैठकीला हजर होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )