त्या स्वयंपाकीन महिलांचे मानधन वाढवा

88

– अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकीन महिलांचे मानधन वाढविण्यात यावे व त्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार ही योजना २०१५ पासून सुरु करण्यात अली असून स्वयंपाकीण म्हणून महिलांची फक्त १००० रुपये एवढ्या शुल्लक मानधनावर नियुक्ती करण्यात अली आहे. मागील ९ वर्षांपासून या महिला हे काम नियमितपणे आपले काम करून शासनाची व जनतेची सेवा करीत आहेत परंतु अनेकदा मागणी करूनही त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. अंगणवाड्यामध्ये संपूर्ण स्वयंपाक करण्याचे अतिशय महत्वाचे व मेहनतीचे काम या महिला करीत आहेत. एवढ्या कमी रकमेत महिलांकडून काम करून घेणे हे एक प्रकारे त्या महिलांचे शोषण आणि वेठबिगारी व मानव अधिकारांचे उल्लंघन आहे आणि समस्त महिलांचा अवमान आहे. शासनाच्या किमान वेतन कायद्याचे तर हे सरळ सरळ उल्लंघन आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
स्वयंपाकीन महिलांचे हे शोषण त्वरित थांबविण्यात यावे व त्यांचे मानधन किमान २०००० रुपये करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने यावेळी केली.
सदर निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थकीत मानधन लवकरच अदा करण्यात येईल असे आस्वासन शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे,प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव समृतवर, विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, कृष्णा चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, स्वयंपाकीण संघटनेच्या गीता उईके, अंजु गेडाम, सरिता गवळे, प्रियांका रामटेके यांचेसह अनेक कार्यकर्ते व स्वयंपाकीन महिला उपस्थित होत्या.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here