माझ्या मुलाच्या हत्येची सखोल चौकशी करून आरोपीस शिक्षा द्या : पत्रकार परिषदेत मायेने फोडला हंबरडा

85

– पोलीस अधीक्षकांना स्वतः कडे तपास घेण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : जिल्हयाच्या आरमोरी तालुक्यातील बोळधा येथील २६ वर्षीय युवक प्रशांत रामदास उरकुडे याची हत्या करण्यात आल्याची घटना १८ एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आली होती. याबाबत पोलीस स्टेशन आरमोरी येथे मृतकाच्या कुटुुंबानी तक्रार दाखल केली होती मात्र उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण अनुमान न करण्यायोग्य होते, आरमोरी पोलिसांनी योग्य रित्या तपास न करता आरोपींना मोकळे सोडले आहे असा आरोप करित मृताकाची आई मुक्ताबाई उरकुडे यांनी ३० जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतच हंबरडा फोडला व पोलीस अधीक्षकांनी सदर घटनेचा तपास स्वतःकडे घेऊन सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून  द्यावा अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत मुक्ताबाई उरकुडे यांनी सांगितले की, मुलगा प्रशांत याचे व गावातीलच श्रृती नामक मुलीशी प्रेमसंबध होते. मात्र श्रृतीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देण्याचे यातील आरोपीचे बेत होते. रामनवमीची मिरवणूक असल्याने गावातील सर्व व्यक्ती त्यात व्यस्त होते. मिरवणूकीत प्रशांत हा सुध्दा सहभागी झाला होता. दरम्यान २२ एप्रिल २०२४ रोजी माझे नातेवाईक बळजबरीने दुसऱ्याशी लग्न लावून देणार आहेत त्यामुळे गावाच्या बाहेर भेटण्यासाठी तु ये असे श्रुतीने प्रशांतला फोन करून बोलावले, याबाबतचे संभाषण मी ऐकले तेव्हा मी प्रशांतला एवढया रात्री बाहेर कुठे जाते, मुलीच्या नातेवाईकाने तुझ्या महालप्याला फोनव्दारे तुला सांभाळुन ठेव नाहीतर त्याला मारून टाकु अशी धमकी दिली आहे त्यामुळे तू श्रुतीला भेटण्यासाठी जावू नको असे म्हटल्यावर मुलाने नाही जात असे म्हणून झोपण्याचा बहाणा करून झोपून राहिला व मला झोप लागल्यानंतर मुलगा केव्हा निघून गेला हे मला समजले नाही. रामनवमीची मिरवणुक संपल्यानंतरही माझा मुलगा घरी आला नाही त्यामुळे मोठया मुलाने त्याची शोधाशोध केली असता कुठेही मिळून आला नाही. सकाळच्या सुमारास विजय राउत यांच्या शेतामध्ये प्रशांतचा मृतदेह आढळुन आला व ही घटना श्रुतीच्या प्रेमसंबंधाच्या आकसातून झालेली आहे. पुंजीराम टेमसाजी राऊत, श्रेयश माणिक राऊत, सानिध्य पुंजीराम राऊत तिघेही रा. बोळधा, पो. देलोडा ता. आरमोरी जि.गडचिरोली व विकासा पितांबर पिठाले रा. टेंभा ता.जि.गडचिरोली यांनी माझा मुलगा प्रशांतची हत्या केली आहे अशी आपबिती पत्रकार परिषदेत सांगत हंबरडा फोडला.
पुढे सांगितले की, प्रशांतच्या मृत्युने आम्ही सर्व कुटुुंबिय दुःखामध्ये होतो त्यामुळे कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची मनस्थिती दुर्बल व उदासिन होती त्यामुळे तक्रारीमध्ये काय लिहिले गेले व कुठे सही मारण्यात आली ते कळलेच नाही व मोठ्या मुलाची मानसीक स्थिती विचलित झाली असल्याने त्याच्या तोंडून आरोपींची नावे तक्रारीमध्ये अनावधाने नमुद करण्याचे राहुन गेले. माझ्या परिवारात नातेवाईक हे उच्च शिक्षित व मोठया पदावर शासकीय नोकरीत नसल्यामुळे व आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझ्या मुलाच्या खुनाच्या तपासात आरमोरी पोलीसांकडून योग्य प्रतिसाद न मिळता आठ महिण्यांचा कालावधीत उडवाउडवीची उत्तरे देणे व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू करून संशयित आरोपींना अभय दिलेला आहे. माझा मुलाग मृतावस्थेत ज्या ठिकाणी आठळून आला त्याठिकाणी जमिनीवर झटापटीच्या निशाण्या दिसत असल्याचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आला व त्याचे कपडे व त्याच्या पायातील चप्पल हे देखिल वेगवेगळया ठिकाणी आहेत. आरमोरी पोलीस माझ्या मुलाच्या खुनाच्या प्रकरणात जाणीवपूर्वक डोळेझाक करून आरोपींना मोकळे सोडले आहे असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. तरी या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांनी स्वतःकडे वर्ग करून सखोल चौकशी करावी व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही मुक्ताबाई उरकुडे यांनी यावेळी करीत याबाबतचे निवेदन पोलीस अधिक्षाकांना दिले आहे. त्यामळे आता पोलीस अधीक्षक या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन मुक्ताबाई उरकुडे यांना न्याय मिळवून देतील का याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here