– आधी प्रकल्पग्रस्त आता खेळाचे बनावट प्रमापत्र ?
The गडविश्व
गडचिरोली , १७ जून : गडचिरोली पोलीस भरतीत काही उमेदवारांनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता पुन्हा या भरतीत खेळाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्याची शंका उपस्थित झाल्याने या प्रकरणी गुन्हे शाखेकडून या भरतीत लागलेल्या १५ पोलिसांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केल्याची माहिती आहे.
गडचिरोली येथील पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यभर याचे मोठे रॅकेट उडघडीस आले होते. नुकतीच जिल्हा पोलिस दलातच एकुण ३४८ जागांसाठी भरती राबविण्यात आली होती. यात काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळविली होती. मात्र हे उमेदवार व कुटुंबीय अनेक वर्षांपासून गडचिरोलीचे रहिवासी असतांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यांनी या निनावी पत्राच्या आधारे चौकशीचे आदेश दिले असता चौकशीदरम्यान ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणुन रुजु झालेल्या दोघांना तसेच तात्पुरत्या यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या तिघांना अटक करण्यात आली होती. तसेच राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करुन भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले होते. आता खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका असल्याने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू असल्याचे कळते. चौकशी पूर्ण झाल्यावर यातील तथ्य समोर येणार असून चौकशी कडे लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli police recrutment 2023, sport )