– २०० च्या वर कलाकार करणार रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण
The गडविश्व
गडचिरोली, दि.२४ : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा’ गडचिरोलीकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून २५, २६, व २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) गडचिरोलीच्या पटांगणात प्रयोग होणार आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विवेक सांळुखे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गडचिरोलीच्या पटांगणात ८ हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
दररोज सायंकाळी ६ वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण २०० च्या वर कलाकार करणार आहेत.