महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा जांगदा (बु.) करणार २० हे. आर. क्षेत्रात बांबू रोपवन लागवड

809

– सिईओ आयुषी सिंग ह्यांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : कायदा कागदावर आणायला मेहनत लागतेच पण त्याहीपेक्षा कायदा जमिनीवर उतरविण्यासाठी ताकद लागते. मात्र, ग्रामस्थांचा एकीमुळे हे सहज शक्य करता येऊ शकते याचे उदाहरण गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जांगदा ग्रामसभेने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. सामुहिक वनहक्क प्राप्त धानोरा तालुक्यातील जांगदा (बु.) ग्रामसभाद्वारे बांबू रोपवनाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर ग्रामसभेने एकूण २० हे. आर. क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचा निर्णय घेतला असून १० हे. आर. क्षेत्रावर ६,५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख निर्णय घेणारी जांगदा (बु.) ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामसभा ठरली आहे. बांबू रोपवन कार्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी, उपजिल्हाधिकारी रोहयो साळुंखे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार, एकल सेंटरच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर, तहसीलदार श्रीमती लोखंडे, गटविकास अधिकारी टीचकुले, इंजिनिअर श्रीमती मसराम तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ग्रामसभा जांगदा (बु.) चे सर्व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामसभेला मार्गदर्शन करतांना सीईओ आयुषी सिंग म्हणाल्या की, ग्रामसभा रोहयो अंतर्गत बांबू, फळबाग, अशा निरंतर उत्पादन वाढीचे रोजगार देणारी कामे घ्यावी. तसेच ग्रामसभेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यासोबतच, गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाभरात सुरु असेलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षित ग्रामसभेला मानव विकास मिशन अंतर्गत गोडाऊन बांधकाम करणे २०२२-२३ या योजनेतंर्गत १०० मे. टन क्षमतेचे गोडाऊन मंजूर करण्यात आले आहे. ग्रामसभेने सदर गोडाऊनचे स्वतः बांधकाम पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व ग्रामसभेसाठी योग्य उदाहरण निर्माण करणाऱ्या जांगदा (बु.) या ग्रामसभेने एकूण २० हे. आर.क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचा निर्णय घेतला असून ० हे. आर. क्षेत्रावर ६,५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामसभेच्या माहितीप्रमाणे, जंगलातील ५ हे. आर. क्षेत्र पुर्वीपासून ‘देवराई’ म्हणून आरक्षित आहे आणि ते पुढेही असणार आहे.
कार्यक्रमादरम्यान एकल सेंटरच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर यांनी अतिशय कुतूहलाने ग्रामसभेचे अभिनंदन करून ग्रामसभेने प्रशिक्षणाचे योग्यरित्या अंमलबजावणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच इतर सर्व ग्रामसभांनी यातून प्रेरणा घेत या ग्रामसभेच्या पावलामागे पाऊल ठेवून ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाच्या मदतीने अनेक विकास कामांची सुरुवात आपल्या ग्रामसभेत करण्याचे आवाहन केले. आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा अनेक सक्षम ग्रामसभा निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, ग्रामसभा जांगदा (बु.) चे सर्व सदस्य, शासकीय कर्मचारी वर्ग व एकल सेंटर टीमने प्रयत्न केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #jangda #dhanora #bambulagvad )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here