The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील जपतलाई ते मोडेभट्टी या रस्त्याचे खडीकरण नुकताच खाजगी कंत्राटदाराने केले पण पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने रस्त्याची पोलखोल केली आहे. त्यामुळे रस्ता किती मजबूत आणि त्यावरती टाकलेला मुरुम किती याची स्पष्ट कल्पना प्रवास करताना प्रवाशांना व वाहन धारकांवर येत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील जपतलाई पासुन मोहली गावाकडे जाणारा रस्ता मोडेभट्टी गावापर्यंत अंदाजे ४ कि.मी.अंतरावरील रस्ता फुटला होता. जागोजागी खड्डे पडलेले होते. त्यामुळे नव्याने रस्ताचे खडीकरण करण्यासाठी खोदण्यात आले. त्यानंतर गिट्टि पसरविण्यात आली, गिट्टी ची दबाई चांगल्याप्रकारे करण्यात आली नाही. गिट्टीवर चुनखडी मुरुम टाकण्यात आले ते सुद्धा कमी प्रमाणात त्यामुळे पहिल्या पाण्यातच गिट्टीवरील मुरुम पाण्याने वाहून गेला व गिट्टी मोकळी झाली. याचाच त्रास प्रवाशांना व वाहनधारकांना सोसावा लागत आहे.
मुरूम टाकला परंतु त्याची घोटाई योग्य रीतीने केली नाही त्यामुळे त्या रस्त्यावर पूर्णपणे चिखल झाले असून जाणाऱ्या येणाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. रस्ताच बनवायचा होता तो उन्हाळ्यामध्ये का बनवला नाही आणि पावसाळ्यामध्ये रस्ता फोडून त्यावर पांढरे चुनखडी युक्त मुरूम टाकले. दुचाकी वाहनांना गाडी काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरुन दुचाकी वाहन धारक घसरुन पडला आणि दुखापत झाली किंवा एखाद्याचा जीव जर गेला तर त्याला जबाबदार कोण ? ठेकेदार की इतर असा प्रश्न विचारत आहे. संबधीत रस्त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #japatlai )