फुटपाथ धारक भूमिपुत्रांच्या पोटावर लाथ ; शेकापचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

37

– रोजगाराची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : शहरातील फुटपाथवर छोट्या व्यवसायांद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या टपऱ्या हटविण्यात आल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांना तातडीने पर्यायी जागा व रोजगार उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शहरातील गुजराती व मारवाडी व्यापाऱ्यांच्या मोठ्या दुकानांना फायदा मिळावा या हेतूने स्थानिक भूमिपुत्रांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. आमदार डॉ. नरोटे यांच्या पुढाकाराने नगर परिषदेने ही कारवाई केली. अतिक्रमण हटविणे आवश्यक असले तरी केवळ गरीब फुटपाथ धारकांना लक्ष्य करणे अन्यायकारक आहे.
प्रस्तावित सर्व्हिस रोड क्षेत्रातील मोठ्या भांडवलदारांचे अतिक्रमण मात्र आजतागायत हटविले गेलेले नाही. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नगर परिषदेच्या कारभारात दुजाभाव दिसून येतो. गांधी चौकातील अतिक्रमित जागांवर नगर परिषदेने शुल्क घेऊन जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देणे हा नियमबाह्य प्रकार असून, त्यामार्फत गरीबांवर अन्याय केला जात आहे, अशी टीकाही जराते यांनी केली.
विशेष म्हणजे, अतिक्रमण हटविण्यात आलेले सुमारे ७० टक्के फुटपाथधारक हे भाजपचे मतदार असूनही त्यांना सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षित केले. हे सर्व नागरिक स्थानिक भूमिपुत्र असून त्यांचा रोजगार हिरावणे ही अमानुष व भेदभावपूर्ण कृती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व प्रकारांवर तातडीने तोडगा काढून, स्थानिक फुटपाथ व्यवसायिकांसाठी पर्यायी जागा व व्यवसायाची संधी निर्माण करावी, अशी जोरदार मागणी करत शेतकरी कामगार पक्षाने आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
गोरगरीब जनतेच्या पोटावर लाथ मारणाऱ्या कोणत्याही सत्ताधाऱ्याला आम्ही माफ करणार नाही. अन्यायाविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here