– परिसरात भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी येथे धुमाकूळ माजवत १४ घरे जमीनदोस्त केल्याची खळबळजनक घटना २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास केली. आनंदराव हलामी, बारीकराव मडावी, आसाराम मडावी, भाऊदास मडावी, तुकाराम मडावी, सखाराम मडावी, चून्नीलाल बूद्धे, दिलीप मडावी, लालाजी मडावी, धर्मराव हलामी, शामराव काटेंगे, यशवंत हलामी, रैसू हलामी, मंगरू हलामी यांचा घराची नासधूस झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील आंधळी (सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कुटुंब असलेला आंबेझरी हे गाव डोगंर व घनदाट जंगलाने वेढलेले आहे. २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास १८ ते २०च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गावावर हल्ला चढवला व घराची नासधूस केली. अचानक हल्ला झाल्याने नागरिकांनी मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव केली. काही वेळाने गावकऱ्यांनी टेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद न देता धुडगूस सुरुच ठेवला. घटनेची माहिती मिळताच पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली व पंचनामा केला. दरम्यान या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.