– मेंढा फाट्यावर थरकाप उडवणारी घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : कुरखेडा-वडसा मार्गावरील मेंढा (कसारी) फाट्याजवळ गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बिबट्याच्या अचानक समोर आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातात श्रीरामनगर, कुरखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारातील लिपिक धनंजय हरीभाऊ कूथे (वय ५२) आणि पत्नी धनश्री धनंजय कूथे (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही नातेवाईकाच्या लग्नासाठी दुचाकीने मांढळ (ता. लाखांदूर) येथे जात असताना त्यांच्या समोर अचानक बिबट आला आणि जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकी रस्त्यावर आदळली आणि पती-पत्नी दोघेही दूर फेकले गेले.
धनंजय कूथे यांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे डोक्याचे गंभीर नुकसान टळले, मात्र हेल्मेट पूर्ण मोडले असून, हात-पायांना गंभीर दुखापत झाली आहे. पत्नी धनश्री कूथे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेनंतर रस्त्यावरून जाणाऱ्या शिक्षक दांपत्य गिरीधर फूलबांधे, सूनिता फूलबांधे आणि त्यांचा मुलगा तुषार फूलबांधे यांनी प्रसंगावधान राखून जखमींना स्वतःच्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालय, कूरखेडा येथे दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेव फाये आणि नगरसेवक सागर निरंकारी यांनी रुग्णालयात भेट देत जखमींना मदत केली.
या घटनेमुळे वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुख्य रस्त्यालगत बिबट्याचा मुक्त संचार ही गंभीर बाब असून, तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठे जीवितहानीचे संकट ओढवू शकते. नागरिकांनी या घटनेची चौकशी करून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
