कुरखेडा : सती नदीच्या नवीन पूलाचे बांधकाम रखडले

892

-पावसाळ्यात ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तूटणार ?
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २९ : तालुक्यात सध्या ब्रम्हपूरी ते देवरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सूरू आहे. या अंतर्गत शहरालगत असलेल्या सती नदीवरील जुना मात्र व्यवस्थीत असलेल्या पुलाला तोडत राष्ट्रीय महामार्गाचा अनुकूल असलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र सदर पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळे मागील एक महिण्यापासून बंद पडल्याने पावसाळ्यात या मार्गावरून आवागमन करणाऱ्या गावकऱ्यांना अडचण निर्माण होत तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर ते रायपुर या राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची ते देवरी या मार्गाचे रूंदीकरण तसेच मार्गा दरम्यान येणाऱ्या पुलांची क्षमता वृद्धि करीता उंचीकरण व रूंदीकरणाकरीता नविन पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत कुरखेडा येथील सती नदीवर असलेला कमी उंचीचा मात्र मजबूत असलेल्या जून्या पुलाला तोडत नविन पुलाच्या बांधकामाला दोन महिण्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. पोकलेन व जेसीबी चा मदतीने नविन पुलाच्या पायव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे मागील एक महिण्यापासून पुढील बांधकाम रखडल्याने या मार्गावरून पावसाळ्यात आवागमन सुरू राहील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.पावसाळा सूरू होण्याकरीता जवळपास दोन महिण्याचा कालावधी शिल्लक आहे. सध्या आवागमनाकरीता तोडण्यात आलेल्या जुन्या पुलाच्या बाजूने कच्चा रपटा तयार करण्यात आला आहे. मात्र हा रपटा पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाला थोपविणे शक्य नाही, त्यामूळे पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण न झाल्यास या मार्गावरील आवागमन बंद पडेल अशी शंका निर्माण झाली आहे. या मार्गावरून कोरची, मालेवाडा, कढोली या प्रमुख मार्गावरील अनेक खेडेगांव जोडलेली आहेत. जवळपास‌ असलेल्या अनेक खेडेगावातील विद्यार्थी शिक्षणाकरीता, रुग्ण उपचाराकरीता तर ग्रामस्थ बाजारपेठेत खरेदी करीता व शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामाने येत असतात तसेच अनेक शासकीय कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत सेवा देण्याकरीता ग्रामीण भागात दररोज या मार्गावरून आवागमन करतात. या रखडलेल्या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास सर्वांची अडचण होणार आहे. इतर पर्यायी मार्ग लांबचे व त्रासदायक असल्याने यांचा पावसाळ्यात तालुका मुख्यालयाशी संपर्कच तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने या रखडलेल्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda #wadsa #korchi )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here