– रेती तस्करांचे धाबे दणाणले
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ११ जून : तालुक्यातील सती नदी पत्रातून अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर अखेर तहसीलदारांनी कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. सदर कारवाई ने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील सती नदी पत्राच्या कुंभिटोला घाटातून अवैध उपसा करून रेती तस्करी केल्या जात होती. याबाबत वारंवार महसूल विभागाला सूचना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता व रेतीतस्कर राजरोसपणे रेती उपसा करून चोरी करत होते. मात्र नवनियुक्त तहसीलदार राजकुमार धनबाते यांना ही बाब कळताच तीन दिवसांपासून वाळू उपसा करणाऱ्यांवर पाळत ठेवत अखेर शनिवार १० जून रोजी रात्रोच्या सुमारास आपल्या पथकासह गस्त करत असतांना सती नदी पत्रातून ट्रॅक्टर रेती भरून निघाल्याची माहिती मिळताच नियोजित भरारी पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग करत तहसिल कार्यालयासमोर टएम एच ३४ ए पी ३११२ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळूसह पकडले. तर त्या नंतर लगेच सती नदी येथील वाळू भरत असलेले दोन ट्रॅक्टर मोक्यावर पकडले. सती नदीत एम एच ३३ एफ ४८११ व एम एच ३३ वी ३२३७ क्रमांकाचे दोन्ही ट्रॅक्टर भरारी पथकाच्या हाती लागले. दरम्यान पकडले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्याकरीता नेत असताना एम एच ३३ वी ३२३७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चालक घेवून पसार झाला.
सदर कारवाई नंतर सुरक्षेच्या दृष्टीने पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर कुरखेडा पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आलर. सदर कारवाई करण्यात आलेले ट्रॅक्टर हे कुरखेडा येथील तुषार कुथे, तळेगाव येथील सचिन सहारे व मालदुगी येथील महेंद्र सहारे यांचे मालकीचे असल्याचे कळते. त्याविरुद्ध गौण खनिज कायद्या अंतर्गत प्रकरण दाखल केल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तसेच सदर कारवाई नंतर तहसिलदार राजकुमार धनबाते यांनी अवैध गौण खनिजांची लूट करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे बोलून दाखविले. कारवाई दरम्यान पसार झालेला ट्रॅक्टर हा यापूर्वीही दोनदा वाळू उपसाच्या प्रकरणात अडकला असल्याची माहिती समोर आली असून आता सदर ट्रॅक्टर वर दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी दाखल होणार असल्याची माहिती आहे.
या कारवाईने मात्र अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, Kurkheda, crime news)