कुरखेडा नपं ला अखेर आली जाग ; त्या अवैध गाळे बांधकामविरोधात बजावली नोटीस

711

– स्वतःच्याच मर्जीने सुरू होते अवैध बांधकाम
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १ जून : शासकीय मालमत्तेतून शासनाला महसूल मिळत असतो मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्या मालमत्तेला कोण हडपेल हे सांगता येत नाही. असाच प्रकार कुरखेडा नगर पंचायत अंतर्गत दिसून आल्याने एकाने तक्रार केली असता उशीरा का होईना नगर पंचायत जागी होत त्या अवैध बांधकामाविरोधात नोटीस बजावत काम थांबविले आहे. मात्र सदर प्रकरणातून नगर पंचायतीची आपल्या मालमत्तेसंबंधी असलेली तत्परता मात्र दिसून आली आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने कमावून ठेवलेली मालमत्ता नगर पंचायत टिकवून ठेवणार काय ? असे वृत्त प्रकाशित झाले होते. कुरखेडा ग्रामपंचायत काळातील १६ व १७ क्रमांकाचे दुकान गाड्याची मोडतोड करून कुठलीही परवानगी न घेता अवैधपणे दुकान तोडून स्वमर्जीने बांधकाम सुरू होते. याबाबत एकाने नगर पंचायतीला एका महिण्यापूर्वी तक्रार केली मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. सदर प्रकरण झाकण्याचा व मुद्दाम कानाडोळा करण्याचा केविलवाणा प्रकार नगर पंचायतीकडून सुरू होता. एक महिना होऊनही तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने व राजरोसपणे अवैध बांधकाम सुरू असतांना मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरण उजेडात आणून उचलून धरल्याने नगर पंचायत जागी होत अखेर उशिरा का होईना त्या अवैध बांधकाम विरोधात नोटीस जारी करत बांधकाम तात्काळ थांबविण्यास लावले आहे.
सदर प्रकरणाने नगर पंचायतीअंतर्गत अनेक प्रकार उघडकीस आले असून नपं ने वेळोवेळी भाडेकरूंना नवीन भाडे करार करण्याकरिता सूचना पत्र पाठवले आहेत मात्र त्याकडे कानाडोळा करत नुतनीकरण न केल्याचे समोर आले आहे, तसेच मुख्य मार्गावर रस्त्यालगत होत असलेल्या अवैध बांधकामाबाबत नपं अनभिज्ञ होते काय ? त्यावर नपं ची नजर पडलीच नाही काय ? बांधकामाला मुकसंमती होती काय ? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची मूळ प्रत अधिकाऱ्यापर्यंत पोहचलीच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून नपं च्या आवक जावक टेबलवर दाखल केलेल्या तक्रारी एका महिन्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत न पोहचणे ही गंभीर बाब असून मुद्दाम तर ती तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ दिली नाही ? असाही सवाल उपस्थित होत आहे. एकूणच हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असतांना दिसत आहे. सदर प्रकरणी पुढे काय कारवाई नपं करते याकडे लक्ष लागले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, kurkheda nagar panchayat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here