कुरखेडा : घनकचरा डेपोला आग, विषारी धुराने परिसरात दाटले संकट

87

– नगरपंचायतीच्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा (चेतन गहाणे) दि. २३ : कुरखेडा नगरपंचायतीच्या वाकडी रोड येथील घनकचरा डेपोला काल रात्री लागलेल्या भीषण आगीने परिसरात आरोग्य आणि पर्यावरणाच्या संकटाचे सावट निर्माण केले आहे. कचऱ्यातील प्लास्टिक, कागद आणि इतर घातक पदार्थ जळल्याने कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि PM2.5 यांसारखे विषारी वायू हवेत मिसळले. परिणामी परिसरात धुराचे लोट पसरले असून, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असून आरोग्य धोक्यात आले आहे.
ही आग अपघाती नसून, नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार आवश्यक असलेले कचऱ्याचे वर्गीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सुरक्षित विल्हेवाट यांची पूर्णतः पायमल्ली होत असल्याचे या घटनेने उघड झाले आहे. वाकडी रोड डेपोमध्ये कचरा उघड्यावर टाकला जातो, कुठलाही वर्गीकरण केला जात नाही आणि सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कचरा जाळणे हा सर्रास प्रकार असून, यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. डेपोच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, माशा आणि डासांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाला या परिस्थितीची पूर्ण माहिती असूनही कुठलीही ठोस कारवाई न करणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी योग्य सुविधा निर्माण करणे, शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा आधुनिक डेपो उभारणे, आगीसारख्या घटनांसाठी अग्निशामक व्यवस्था आणि नियमित देखरेख करणे, तसेच घनकचरा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे या तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी केली आहे.
प्रशासनाने तात्काळ जागे होऊन उपाययोजना न केल्यास हवेतील विषारी प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे परिणाम यामुळे पुढे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here