– शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि.०५ : तालुक्यातील काढोली येथील जि.प. उच्च प्रा. केंद्र शाळा (मुले) ही पंचायत समिती कुरखेडातील सर्वात मोठी शाळा असून येथील १३१ विद्यार्थ्यांचा भार चार शिक्षकावर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू शकत नसल्याने शाळेत दोन शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शाळेतील शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच,सदस्य, पालक वर्गाने गट शिक्षणाधिकारी कुरखेडा यांच्या मार्फतीने संवर्ग विकास अधिकारी पं.स.कुरखेडा यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, काढोली येथील जि.प. उच्च प्रा. केंद्र शाळा (मुले) मध्ये विद्यार्थी संख्या १ ते ५ वर्गात पटसंख्या ९२ व सहावी ते सातवी मध्ये ३९ असे एकूण विद्यार्थी संख्या १३१ आहेत. परतू शिक्षक मात्र चार आहेत. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा भार केवळ चार शिक्षकांवर आहे. तसेच एका शिक्षकाकडे बीएलओ ची जबाबदारी आहे. शिवाय इयत्ता सहावी व सातवी ला विषय शिक्षक नसल्याने गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील पालक वर्ग नाराज आहेत. शिक्षकाअभावी मुलांना योग्य शिक्षण नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून मुकत आहेत. त्यामुळे शाळेत दोन शिक्षकांची नितांत गरज असून विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेत दिवाळीपूर्वी तात्काळ दोन शिक्षक द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास अन्यथा दिवाळी नंतर लगेच शाळेला कुलूप ठोकण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात शाळेचे मुख्याध्यापक, ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच ,सदस्य, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, सदस्य, पालक वर्ग यांनी स्वाक्षरी केली आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेला दिवाळीपूर्वी दोन शिक्षक मिळतील काय ? शिक्षक न मिळाल्यास दिवाळी नंतर शाळेला कुलूप लागणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.
(the gadvishva, gadchiroli news updates, kurkheda, kadholi, school news)