कुरखेडा : माजी मंत्री शिवाजीराव मोघे विरोधात माना जमात आक्रमक

1678

निषेध दर्शविण्यासाठी माना समाज बांधव एकवटले
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १३ ऑक्टोंबर : आपली सत्ता आली तर माना समाजाला अनुसूचित प्रवर्गातून हटवून टाकू, असे विधान राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने माना समाजात संतापाची लाट पसरली आहे. आज शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी कुरखेडा येथे माना समाजबांधवांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला.
नागपूर येथे नुकताच आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी माना समाजाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार नामदेव उसेंडी यांचीही उपस्थिती होती. पण त्यांनी या भाष्याचा विरोध केला नाही. आपली सत्ता आली तर हायर पावर कमिशन नेमण्यात येईल. या माध्यमातून अनेक जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आले. या यादीत माना समाजाचाही समावेश आहे. माना समाजाला अनुसूचित प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान मोघे यांनी केले होते. शिवाजीराव मोघेंचे वक्तव्य हे द्वेषभावनेतून आहे. त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे. त्यांच्या वक्तव्या विरोधात कुरखेडा येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोघे यांच्याविरोधात नारेबाजी व घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला.
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, आदिम माना जमात मंडळ, कुरखेडा तालुका माना जमात विकास संस्थेच्या विविध प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे हे माना समाजाचे आहेत. या परिसरात मोठ्याप्रमाणात माना समाज वास्तव्यास आहे. माना समाज विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. माना ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. समाजाच्या स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज १८ व्या क्रमांकावर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले होते व तेव्हापासूनच माना समाज अनुसूचित प्रवर्गात मोडतो.

पोलिसात मोघे विरोधात तक्रार

शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माना समाजाने केली आहे. यासंदर्भात कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती आहे. शिवाजीराव मोघे यांनी वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण केली आहे. यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या मोघेंवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माना समाजाचे पदाधिकारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here