– विभागीय आयुक्तांनी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे दिले निर्देश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १५ ऑगस्ट : स्थानिक कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या १० दुकान गाळे लिलाव प्रकरणी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार असून नागपूर विभागीय आयुक्तांनी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिले आहे.
येथील प्रशासन अधिकारी प्रवीण सूर्यकांत गिरमे व मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी स्थायी आदेश २४५ चे उल्लंघन करून लबाडीने खुले लिलाव न करता परस्पर १० दुकान गाळे गैरमार्गाने आर्थिक देवाणघेवाण करून दुकान गाळे हस्तांतरित केल्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करणे तसेच सेवेतून निलंबित करून बडतर्फ करणे बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून नगर नगरपंचायत कुरखेडाचे मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या या दोन अधिकाऱ्यांना सदर प्रकरण चांगलेच भोवणार आहे.
कुरखेडा नगर पंचायत येथे बांधकाम करण्यात आलेले एकूण २६ दुकान गाळे लिलाव करणे होते. परंतु नगर पंचायत कुरखेडाचे प्रशासन अधिकारी प्रवीण सूर्यकांत गिरमे व मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी लबाडी करून लिलाव न करता २६ दुकान गाळ्या पैकी १० दुकान गाळे गैरमार्गाने आर्थिक देवाणघेवाण करून हस्तांतरित केले आहे. सदर गैर व्यवहारामुळे नगरपंचायत कुरखेडा चे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेले आहे.
२९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या लिलाव प्रक्रिये करिता दैनिक “तरुण भारत” मध्ये १६ गाळे व गडचिरोली येथील साप्ताहिक “क्रांती प्रेरणा” मध्ये लपून १० गळ्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. एकाच दिवशी होणाऱ्या २६ गाळ्यांच्या लिलावाची जाहिरात एकाच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध न देता स्थानिक नसलेल्या साप्ताहिक पत्र मध्ये देण्यात आल्या. या करिता अधिक खर्च भुर्दंड नगर पंचायत वर झाला. नगर परिषद प्रशासन संचालनालय स्थायी आदेश २४ चे परिच्छेद ४ नुसार मुख्याधिकारी यांनी एक किंवा जास्त स्थानिक वृत्तपत्रात जाहीर लिलावाची प्रसिद्धी देणे अपेक्षित होते. परंतु लिलाव न करता परस्पर दुकान गाळे देवून गैरमार्गाचा अवलंब करत लिलाव गाळे संख्याचा तुकडे करून स्थानिक लोकांपासून लपवून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. उपलब्ध लिलाव बोली बुक मध्ये सर्व बनाव करण्यात आला असून कोणत्या दुकान गाळ्या करिता कोणी किती बोली बोलली हे स्पष्ट नाही. माहिती अधिकारात मागितलेल्या दस्तएवजात सदर धक्कादायक माहिती उघड झाली होती. लिलावाची व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून या मध्ये फक्त २४ लोकच लिलावात सहभागी असल्याचे दिसत आहेत व १६ गळ्यांचेच लिलाव बाबत प्रक्रिया केली जात असल्याचे दिसत आहे. परंतु कागदोपत्री ३६ लोकांनी सहभाग घेतला असा बनाव केला गेला.
१० लोकांसोबत संगनमत करून १० दुकान गाळे लिलाव न करता परस्पर आर्थिक व्यवहार करून गैर मार्गाने खोटे दस्तेवाज तयार करून गाळे त्यांचे नावे हस्तांतरित केलेले आहे. अधिमुल्या रकमेवर फक्त १,२ हजार रुपये वाढीव दाखवून गाळे लिलाव केल्याचा बनाव करण्यात आला असून परस्पर हस्तांतरित केलेल्या दुकान गळ्यात लिलाव करीत अटी व शर्ती पालन हि झालेले नाही. अट क्र. २४ नुसार “जुन्या दुकान संकुलातील अस्तित्वात असलेल्या भाडेकरुंना किंवा परिवारातील व्यक्तींना नवीन दुकान गाळ्यांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही” अशी अट असताना सुद्धा मौजा कुरखेडा वि. नं. ४.१, मधील न.भू. क्र. २३८ चौ.मी. २२२०.८८ सत्ता प्रकार फ जागे पैकी अनु. क्र. ८९७ आर.सी.सी. दुकान गाळा नं. ०१ येथील जुने भाडेकरू असलेल्या परिवारातील व्यक्तींना लिलावात सहभागी करून घेत भाडेपट्टा करारनमा करून दिलेला आहे. त्याच प्रमाणे अट क्रमांक २९ नुसार “गाळे लिलावात भाग घेणारा हा नगरपंचायत कुरखेडा हद्दीतील/क्षेत्रातील असावा” असे नमूद असताना सुद्धा मौजा कुरखेडा वी.नं. ४ १ मधील न.भू.क्र. २३९ चौ. मी. २३४.३४ सत्ता प्रकार ई जागे पैकी अनु.क्र. ८८४,८८० मालमत्ता क्र. ९०४ , ९०० आर. सी. सी दुकान गाळा क्रमांक ४, ८ नगरपंचायत कुरखेडा हद्दीतील नसलेल्या लोकांना लिलाव न करता परस्पर भाडेकरार करून मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आलेला आहे.
प्रत्यक्षात लिलाव झाला असता तर कुरखेडा नगरपंचायतीला इतर गाळे लिलाव प्रमाणे लाखो रुपये महसूल मिळाला असता. मात्र परस्पर गाळे दिल्यामुळे नगरपंचायतचे आर्थिक नुकसान झाले. लिलाव व परस्पर अवंटीत केलेल्या दुकान गाळ्याचे करारनामा करून घेतांनाही अधीमुल्य रकमेचा उल्लेख करारनाम्यात न करता फक्त बाजार भाव उल्लेख करून लाखो रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा महसूलही बुडवीण्याचा कसूर केलेला आहे. नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत प्रवीण गिरमे हे सर्व प्रशासकीय काम नगर पंचायत कुरखेडा येथे हाताळत असून त्यांनी स्वतः व डॉ. माधुरी सलामे यांनी आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने सदर गैव्यवहार केलेला आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय स्थायी आदेश क्र. 24, क्र. नपाप्रसं/1-6/सर्व नपा/2004/944/कक्ष 7, दिनांक 28 ऑक्टोबर 2004 चे परिच्छेद 2 फ चे स्पष्ट उल्लंघन असून खुले लिलाव न करता परस्पर 10 दुकान गाळे अवंटीत केले आहे. सदर प्रकरणात उपलब्ध दस्तऐवज नुसार प्रथमदर्शी नियमांची पायमल्ली झालेली दिसत असून उपरोक्त नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही न करता नगरपंचायत कुरखेडाचे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणात सामील नगरपंचायत प्रशासन अधिकारी प्रवीण गिरमे व मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलमे यांना जबाबदार धरण्यात यावे. सदर प्रकरणी सविस्तर चौकशी करून गुन्हे दाखल करून नगर पंचायत कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील प्रशासन अधिकारी प्रवीण सूर्यकांत गिरमे व मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांना सेवेतून निलंबित करून बडतर्फ करणे कामी योग्य चौकशी करून कार्यवाही करून घेणे बाबत विभागीय आयुक्त यांना तक्रार सादर करण्यात आली होती. साक्ष पुरावे व प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. यामुळे आता कुरखेडा न. पं मधील दुकान गाळे लिलाव प्रकरणी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार उभी आहे. या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvisha, gadchiroli news, kurkheda nagar panchayat )