The गडविश्व
कुरखेडा, दि. २८ : कुरखेडा नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालये आणि मूत्रालयांची दुरवस्था आता नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या गगनभेदी घोषणा प्रत्यक्षात हरताळ फासल्या गेल्या असून, शौचालयांना कायमस्वरूपी ताले ठोकण्यात आले आहेत, तर मूत्रालये कचऱ्याचे ढीग आणि असह्य दुर्गंधीने भरून राहिली आहेत. आरोग्य विभाग व नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बाजारवाडी आणि इतर मुख्य भागातील शौचालये बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला आणि वृद्धांना भीषण अडचणींचा सामना करावा लागत आहे. “शौचालये बंद असतील तर आम्ही कुठे जावे?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा हेतूच मोडीत निघाल्याची भावना सर्वत्र दिसून येते.
दरम्यान, सार्वजनिक मूत्रालयांची अवस्था आणखी भयावह आहे. नियमित स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे ढीग आणि तीव्र दुर्गंधी यामुळे ही ठिकाणे वापरासाठी पूर्णतः अयोग्य बनली आहेत. “मूत्रालये म्हणजे आता कचराकुंडीच झाल्या आहेत,” अशी जळजळीत टीका नागरिकांनी केली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेली शौचालये व मूत्रालये पडद्याआड जाणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांचा संयम सुटू लागला असून, “शौचालये त्वरित खुली करावीत आणि मूत्रालयांची नियमित स्वच्छता करावी,” अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहील, याची जाणीव प्रशासनाला करून देण्यात आली आहे. आता नगरपंचायत आणि आरोग्य विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.
