The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) २० सप्टेंबर : तालुक्याच्या ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयी असलेल्या शाळा महाविद्यालयात मोठ्या संख्येत विद्यार्थी येतात. शासनातर्फे मानव विकास योजने अंतर्गत एस टी बसची सुविधा करून देण्यात आली आहे मात्र या बसेस अनियमित असल्याने याचा फटका तालुक्यातील विद्यार्थाना सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थाना बस अभावी पायपीट करावी लागते किंवा शाळा बूडवावी लागत असल्याने सदर बसेस नियमित करण्यात यावे अशी मागणी विद्यार्था कडून करण्यात येत आहे.
तालूका मुख्यालयापासून शिरपूर चे अंतर जवळपास १५ किमी येवढे आहे. येथील विद्यार्थी मोठ्या संख्येत तालुका मुख्यालयात शिक्षणासाठी येतात. मात्र येथील बस फेरी नियमित नसल्याने येथील विद्यार्थाना अनेकदा १५ किमी चे अंतर पायी पार करावे लागते. येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच आपली व्यथा सोशल मीडिया माध्यमातून मांडल्याने खळबळ माजली आहे. या शिवाय या शैक्षणिक सत्रात मानव विकास चे बस फेऱ्या अनियमीत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थाना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी खेडेगांव, पलसगड तसेच कढोली येथील विद्यार्थी रात्री ८ वाजेपर्यंत येथील बस स्थानका वरच ताटकळत होते. विशेष म्हणजे यात विद्यार्थिनींची संख्या मोठी होती. त्यामूळे या अनियमीततेचा फटका महिला सूरक्षेवर सूद्धा होऊ शकतो. येथील बस स्थानकावर ०५:३० वाजेनंतर प्रवाशाना माहीती देणारा कुणी वालीच नसतो. येथील बस स्थानक प्रमुख कार्यालयीन वेळ संपताच मुख्यालय सोडत बाहेर गावी निघून जातात.
#कुरखेडा : मानव विकास मिशन बसच्या अनियमिततेने विद्यार्थ्यांची पायपीट
– सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा #gadchiroli #kurkheda #गडचिरोली pic.twitter.com/W1Sv6wCcrg— THE GADVISHVA (@gadvishva) September 20, 2023
यापूर्वी येथे पदस्थ बसस्थानक प्रमूख राजेश राठोड हे मुख्यालयी राहत सेवा देत असल्याने एखादी मानव विकास ची बस फेरीला उशीर झाला किंवा रद्द झाली तरी ते मूख्यालयी उपस्थीत राहत असल्याने वेळेवर विद्यार्थांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः इतर बस फेरीना विद्यार्थाना गंतव्या पर्यंत सोडण्याची खबरदारी घेत होते. मात्र त्यांचे येथून काही दिवसापूर्वीच अचानक स्थांतरण झाले व नव्याने येथे बसस्थानक प्रमूख म्हणून शिवणकर यांची नियूक्ती करण्यात आली मात्र ते मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. एस टी महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी व पालकाकडून करण्यात आली आहे.
आज अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांची येथील तहसील कार्यालयात आढावा सभा होती. येथे गूरनोली, अरतोंडी, देऊळगाव, शिरपूर खरमतटोला येथील विद्यार्थीनींनी ना. आत्राम यांची भेट घेत त्यांचाकडे आपली समस्या मांडली. त्यानी लगेच भ्रमनध्वनीवर गडचिरोली आगार व्यवस्थापक सालोटकर यांचाशी संपर्क करीत ही समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.