– कुंभिटोला येथील प्रकरण पुन्हा तापले, कारवाई करण्याची केली मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १५ मे : तालुक्यातील कुंभिटोला (kumbhitola) येथील नदीपात्रातून अवैध रेतीची उत्खनन करून गावातून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला गावकऱ्यांनी रोखले असता चालकाने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १५ मे रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी सतर्कता बाळल्याने मात्र अनुचित घटना घडली नाही. तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटनेने पुन्हा एकदा कुरखेडा (kurkheda) तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध रेती उत्खनन प्रकरण तापले असून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुंभिटोला येथील नागरिकांनी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध रेती उत्खनन प्रकरण काही महिन्यांपूर्वी जिल्हाभरात चर्चेला आले असतांना आणखी सदर प्रकरण तापल्याचे दिसून येत आहे. रेती तस्कर निर्ढावले दिसून येत असून नागरिकांच्या जीवावर उठल्याचा प्रकारही दिसून येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, कुंभिटोला घाटावरून दररोज रात्रोच्या सुमारास रेतीची राजरोसपणे तस्करी होत असते, यामुळे ट्रॅक्टरच्या आवाजाने गावकऱ्यांची झोप मोडती होत आहे तर या प्रकरणी १५ मे रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास काही नागरिकांनी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने नागरिकांवर ट्रॅक्टर चढवून चिरडण्याचाही प्रयत्न केला. ही बाब अत्यंत धक्कादायक असून दरम्यानच्या वेळेस नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने अनुचित घटना घडली नाही. कुंभिटोला घाटावरून दररोज रात्रोच्या सुमारास अवैध रेतीची तस्करी केल्या जात असल्याची माहिती मंडळ अधिकारी यांना दुरध्वनीद्वारे देण्यात आली असता कोणतीही कारवाई होत नसल्याने मंडळ अधिकारी यांचा सरसकट आशिर्वादच रेती तस्करांवर असल्याचे दिसून येत आहे. तर या घटनेबाबत गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून अधिकाऱ्यांसमक्ष कथन केली व तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असता पोलिसांनी कोणतीही तक्रार न घेता परत पाठवले व गुन्हा दाखल केला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेता पोलीस प्रशासन रेती तस्करांच्या दावणीला तर बांधले गेले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून अवैध रेती तस्करी प्रकरणी प्रशासनाने डोळ्यावर काळी पट्टी तर बांधली नाही ना ? असा देखील प्रश्न उद्भवत आहे. सदर घडलेल्या घटनेप्रकरणी सुरेश तुळशीराम कापगते (५५), नरेश हरिराम हरडे (५०) दोघेही रा. कुंभिटोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना केली आहे. निवेदन देतांना चेतन गहाणे, राजू मडावी, नवनाथ मडावी, कैलास जनबंधु, विवेक जनबंधु, रामदासजी मडावी, देवरावजी भेंडारकर, नवनाथजी जनबंधु उपस्थित होते.
एकंदरीत आता कुंभिटोला येथील रेती तस्करी प्रकरण पुन्हा उजेडात आला असून अवैध रेती तस्करांच्या मुसक्या महसूल विभाग अवळणार काय ? पोलिसात तक्रार न घेतल्याने या प्रकरणात पोलीस अधीक्षक हस्तक्षेप करून तक्रार न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार काय ? याकडे लक्ष लागले आहे. ©© ( कॉपीपेस्ट करणाऱ्यांना छोटासा सल्ला : मजकूर जश्याच्या तसा कॉपी पेस्ट करू नये, कॉपी पेस्ट करून स्वतःची वाहवाह करण्यात धन्यता मानू नये, स्वमनाने दोन शब्द लिहिता येत नसेल तर कॉपीपेस्टही करु नये, बातमी पुढे पाठविल्यास आनंद होईल, ज्यांनी कॉपीपेस्ट केले त्यांचा आम्हाला मेल येतो)
(the gdv, the gadvishva, kurkheda, kumbhitoa, gadchiroli news updates, crime news)