कुरखेडा : वाढोणा हत्ती मृत्यू प्रकरणी “त्या” चौघांविरुद्धची तक्रार खोटी

1249

– वाढोणा ग्रामसभेत ठराव पारीत, गुन्हे रद्द करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : तालुक्यातील वाढोणा शेतशिवारात विद्युत प्रवाहाने जंगली हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. या घटनेचा वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करीत असताना काही नागरिकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वनविभागाने कुरखेडा पोलिस ठाण्यात दाखल केली. दरम्यान पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले मात्र वाढोणा ग्रामस्थांनी ही तक्रार खोटी व बिनबुडाची आहे असे सांगत सदर गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारा ठराव २५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर सुरू आहे. अनेकदा शेतपिकांचे नुकसान तसेच काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. रानटी हत्तींचा कळप गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वावरत असताना गोंदिया जिल्ह्यातुन हा कळप परत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातून कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला. ३१ डिसेंबर ला पहाटे हा कळप कुरखेडा तालुक्यातील वाढोणा गावाजवळ पोहचला. वाढोणा येथील शेतकरी रगुनाथ नारनवरे यांनी शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने कळपातील एका मादा हत्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान घटनेची माहिती होताच वनकर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत शेतकरी रगुनाथ नारनवरे याला अटक केली. पंचनामा दरम्यान वाढोणा येथील विनायक धर्माजी गरमळे, रवींद्र वासुदेव गरमळे, विनोद बळीराम गरमळे, बळीराम पांडूरंग गरमळे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचे कारण देत कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असता वाढोणा ग्रामस्थानी सदर कारवाई खोटी असल्याचे सांगत २५ जानेवारी ला ग्रामसभेत चौघांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीचा ठराव पारीत करण्यात आला. ग्रामसभेने पारीत केलेल्या ठरावावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान रानटी हत्तींचा कळप कुरखेडा तालुक्यात वावरत असल्याचे कळते. तर या कळपाने शेतपिकांची नासधूस केली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग हत्तीच्या कळपावर लक्ष ठेऊन बसलेले आहेत.

(the gdv, the gadvishv, gadchiroli, kurkheda, wadhona, vadhona, elephant attack, elephant ded, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here