कुरखेडा : देऊळगाव धान खरेदी अपहारप्रकरणी दोन आरोपींना अटक

878

– 3.96 कोटींचा अपहार उघडकीस
The गडविश्व
गडचिरोली / कुरखेडा, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव धान खरेदी केंद्रात सन 2023-24 व 2024-25 या वित्तीय वर्षांमध्ये एकूण 3 कोटी 96 लाख 65 हजार 965 रुपयांचा धान अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित गुन्ह्याची नोंद आज 19 एप्रिल रोजी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर, (वय 39), (प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. देऊळगाव) रा. लहाण गोधनी, पो. जुना उमरसरा, तह. व जि. यवतमाळ व हितेश व्ही. पेंदाम (वय 35) वर्षे, (विपणन निरीक्षक तथा ग्रेडर) रा. आरमोरी तह. आरमोरी, जि. गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान प्रक्रियेत झालेल्या गंभीर अपहाराचा पर्दाफाश झाला आहे. 2023-24 मध्ये 19860.40क्विंटल धान खरेदी दाखवण्यात आला, मात्र त्यापैकी केवळ 15916.32 क्विंटलच धान प्रत्यक्षात भरडईस गेले असल्याचे चौकशीत आढळले. उर्वरित 3944.08 क्विंटल धानाचा तपशील मिळाला नसल्याने 1 कोटी 53 लाख 93 हजार 980 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.
त्याचप्रमाणे 2024-25 मध्ये 17262.40 क्विंटल धान खरेदी दाखवण्यात आली, मात्र 11122.40 क्विंटलच प्रत्यक्षात केंद्रावर आढळले. उर्वरित 6140 क्विंटल व वापरलेल्या बारदानातील तफावतीमुळे 2 कोटी 42 लाख 72 हजार 885 रुपयांचा अपहार उघड झाला.

या आर्थिक अपहाराच्या पार्श्वभूमीवर उप-प्रादेशिक व्यवस्थापक, कुरखेडा मुरलीधर शंकर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर, विपणन निरिक्षक तथा ग्रेडर हितेश व्ही. पेंदाम, सचिव महेंद्र इस्तारीजी मेश्राम व इतर 13 अध्यक्ष/उपाध्यक्ष व संचालक मंडळ, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देऊळगाव यांनी पदाचे कर्तव्य व जबाबदारी यात कसूर केल्या कारणाने, उप-प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. आरमोरी हिंमतराव सुभाष सोनवणे यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन कुरखेडा येथे आज 19/04/2025 रोजी अप क्र. 69/2025 कलम – 316 (5), 318 (4), 3 (5) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रमुख आरोपी चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर (प्रभारी विपणन निरीक्षक) व हितेश व्ही. पेंदाम (विपणन निरीक्षक) यांना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांच्यासमोर हजर करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत तपास पथकाकडून देण्यात आले आहेत.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महेंद्र वाघ आणि त्यांचे पथक कार्यरत आहे.
संपूर्ण प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या शोषणाची ही विक्राळ उदाहरणे शासनाच्या यंत्रणांतील हलगर्जीपणाकडे बोट दाखवते. या आर्थिक लुबाडणीत दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here