– The गडविश्व’च्या बातमीचा तातडीचा परिणाम, पण प्रश्न अजूनही जैसे थे
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा(चेतन गहाणे) दि. २९ : “कुरखेडा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार : सार्वजनिक शौचालयांना ताले, मूत्रालये बनली दुर्गंधीचे अड्डे” या मथळ्याखाली The गडविश्व न्यूजने २८ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचा प्रशासनावर तातडीचा परिणाम झाला असून नगरपंचायतीने तत्काळ पावले उचलून मूत्रालये स्वच्छ केली. मात्र, शौचालयांना लावलेली ताळे अजूनही कायम असल्याने मूळ समस्या सुटली नसल्याचे चित्र आहे.
The गडविश्व च्या दणक्यानंतर प्रशासन हरकून उठले असले तरी त्यांची कारवाई अर्धवट राहिली आहे. मूत्रालये स्वच्छ झाली, पण बंद शौचालयांमुळे नागरिकांचा संताप कायम आहे. “स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा हवेतच राहतात. प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालये बंद आहेत आणि मूत्रालये कचऱ्याने भरलेली असतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील शौचालयांना लागलेले कुलूप अजूनही उघडण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने घेतलेली स्वच्छता मोहीम केवळ तात्पुरती ‘डागडुजी’ ठरल्याची टीका होत आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय व मूत्रालयांची नियमित स्वच्छता आणि देखभाल अपेक्षित असताना कुरखेड्यातील वस्तुस्थिती मात्र विरोधाभासी आहे. मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांची होणारी रोजची गैरसोय ही लाजिरवाणी बाब ठरते.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, बंद शौचालये तातडीने सुरू करावीत आणि त्यांची देखभाल नियमित केली जावी.

नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा
प्रशासनाची जबाबदारी जितकी, तितकीच नागरिकांचीही. काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवतात, त्यामुळे प्रशासनालाही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
The गडविश्व न्यूज या समस्येवर सतत लक्ष ठेवून आहे आणि पुढेही स्वच्छता व नागरी सुविधांसाठी आवाज उठवत राहील. प्रशासनानेही आता केवळ तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, हीच जनतेची अपेक्षा आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews #ipl2025 )