– अनेक कामे आवासुन उभे असल्याचे नागरिकांचे मत
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२३ : गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसेवक हा महत्वाचा दुवा मानला जातो. असे असतांना तालुक्यातील आंधळी /नव ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका रामटेके ह्या आक्टोबर महिण्यापासुन सतत गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे तसेच नागरिकांचे इतर कामे खोळंबली असल्याने त्रस्त नागरिकांनी अखेर आज गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतील टाळे ठोकले.
कुरखेडा तालुक्यातील आंधठी /नव ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक कु. श्रध्दा रामटेके हया १७ ऑक्टोबर २०२३ पासुन सतत गैरहजर असल्याने गावातील विकास कामे, नागरिकांचे कामे, तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेले शासकीय विज बिल थकित असल्याने जि.प.शाळा येथील लाईट गेल्या एक महिन्यापासून खंडीत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दिवाळी सारख्या सणाला गावातील पथदिवे लावण्यात न आल्याने अनेक क्षेत्रात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने आपल्या स्तरावर चौकशी करून न्याय देण्यात यावा याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली यांना सरपंच व गावातील नागरिकांनी केली. तसेच गावातील नागरिकांनी ग्रामसेवकाच्या सततच्या गैरहजेरीने ग्रामपंचायतीला आज अखेर टाळे ठोकले .
नियमित स्वरूपात ग्रामपंचायत आंधळी येथे सेवा देत आहे. मागील एका महिण्यांपासुन कौटुंबिक समस्यांना तोंड दयावे लागत आहे याबाबत अर्जीत रजेचा निवेदन वरिष्ठांकडे सादर केला होता. आईच्या अकाली निधनाने मानसीक आघात झाल्याने आरोग्याचा त्रास झाला. माझ्याबद्दल गाववासीयांचा काही गैरसमज झाला असेल याबाबत आपण गाववासीयांशी चर्चा करून समजुत घालण्याचा प्रयत्न करू.
– कु. श्रध्दा रामटेके
ग्रामसेविका ग्रामपंचायत आंधळी