– व्यापाऱ्यांनी बांधकाम स्थळाला भेट देत व्यक्त केली चिंता
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १५ : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शहरातील सती नदी घाटावरील जुन्या पुलाला पाडून नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, कामाची गती अत्यंत संथ असल्याने मागील वर्षी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. यावर्षीही तशीच परिस्थिती उद्भवणार का, अशी चिंता स्थानिक व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
ब्रह्मपुरी ते देवरी या राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत सती नदीवरील जुन्या अरुंद पुलाच्या जागी नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, मागील पावसाळ्यात हे काम अपूर्ण राहिल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वाहनचालकांना पर्यायी १५ किलोमीटरचा खडतर मार्ग स्वीकारावा लागला. तसेच, नदीपलीकडील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले.
वाहतूक बंद झाल्याने बाजारपेठेवरही नकारात्मक परिणाम झाला. तसेच, कोरचीमार्गे छत्तीसगडला जाणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त त्रास सहन करावा लागला. त्या वेळी नागरिकांनी संबंधित बांधकाम कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सध्या पावसाळा सुरू होण्यास अवघे दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, त्या तुलनेत पुलाच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. जर हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर यावर्षीही नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. परिणामी, संबंधित विभागाविरोधात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे व वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शहरातील अनाज व्यापारी मोनेश मेश्राम, किराणा जनरल असोसिएशनचे विवेक निरंकारी आणि प्रा. विनोद नागपूरकर यांनी बांधकाम स्थळाला भेट देऊन केली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #kurkhedanews