The गडविश्व
गडचिरोली, २८ डिसेंबर : srcलॅप्रोस्कोपी सर्जरीची सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळावी यासाठी चातगाव येथील ‘सर्च‘ रुग्णालयाने २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी लॅप्रोस्कोपीक सर्जरी कॅम्पचे आयोजन केले होते. स्पेशालिस्ट सर्जन डॉ. शैलेश पुनतांबेकर व टिम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कॅम्पमध्ये १८ रुग्णांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.
लॅप्रोस्कोपी सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया. मोठे छेद न करता केवळ एक ते तीन सेंटीमीटरचे छोटे छेद करून लॅप्रोस्कोप मशीनच्या मदतीने ही शस्त्रक्रिया केली जाते. ही अतिशय कमी जोखमीची आणि कमी टाक्यांची प्रक्रिया आहे ज्यामुळे रुग्णांना जास्त वेदना होत नाहीत किंवा जास्त दिवस रुग्णालयात थांबावे लागत नाही. ही सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळावी यासाठी चातगाव येथील ‘सर्च‘ रुग्णालयाने लॅप्रोस्कोपीक सर्जरी कॅम्पचे आयोजन केले होते. भारतातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ. शैलेश पुनतांबेकर यांच्या मार्गदर्शनात हे कॅम्प पार पडले. डॉ. पुनतांबेकर यांनी भारतात आणि परदेशात अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत व त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात.
सर्च रुग्णालयात झालेल्या या लॅप्रोस्कोपी कॅम्पमध्ये पित्ताशयातील खडे, अपेंण्डिक्स, गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाच्या गाठी, हर्निया यांसारख्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ. शैलेश पुनतांबेकर व त्यांच्या टिमनी १८ रुग्णांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. सर्वच्या सर्व शस्रक्रिया यशस्वी झाल्या असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शस्रक्रिया झालेल्या रुग्णांना नियमित फिजिओथेरपी उपचार करून त्यांना आपले दैनंदिन कामे करण्यास सक्षम करण्यात येत आहे.