सावरगाव पोलिसांनी उभारले वाचनालय

226

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ एप्रिल : पोलिस दादलोरा खिडकी योजने अंतर्गत सावरगाव पोलिसांनी जनतेसाठी भव्य अशा वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण करून ते जनतेसाठी खुले केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून व धानोरा चे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडीची माहिती मिळण्यासाठी गाव पातळीवर वाचनालय निर्माण करण्याच्या जाणिवेने सावरगाव पोलिसांनी गावातच भव्य अशी ग्रंथ दिंडी काढून सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण केले.
कार्यक्रमाची सुरुवात पोलिस केंद्रातून गावातील सर्व लोकांच्या उपस्थितीत वाजत गाजत ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीने झाली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी केले तर अध्यक्ष स्थानी सरपंच मोनिका पुडो या होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थी व नागरिकांना वाचनाचे महत्व पटवून दिले व विद्यार्थी हे भारताचे उद्याचे भविष्य असून त्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार घडणे गरजेचे असते. या वाचनालयाच्या रूपाने सावरगाव हद्दीतील विद्यार्थ्याना त्यांचे भविष्य उज्वल करता येईल असे मत त्यांनी मांडले.
या लोकार्पण सोहळ्याला गावातील सर्व महिला पुरुष बालक युवक युवती वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी अधिकारी रमेश पाटील यांनी उपस्थितांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले तसेच तयार करण्यात आलेल्या वाचनालयाचा उपयोग जास्तीत जास्त युवकांनी घेणेबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांनी केले तर आभार पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे यांनी मानले.
पोलिस मदत केंद्र सावरगाव चे प्रभारी अधिकारी रमेश पाटील तसेच पोउपनि हनमंत नकाते, पोउपनि विश्वंभर कराळे, पोउपनि मनोज जासूद व सर्व अंमलदार यांनी आर्थिक सहकार्याबरोबरच श्रमदान करून सदरचे वाचनालय निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here