-जोगणा येथे दारूबंदीचा ठराव मंजूर
The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : चामोर्शी तालुक्यातील जोगणा येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेसह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी गावात आयोजित बैठकीत सर्वानुमते अवैध दारूविक्रीबंदीचा ठराव पारित केला. सोबतच दारू विक्रेत्यांना बैठकीत बोलावून पुन्हा दारूविक्री न करण्याची ताकीद देण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी गावात दोन दारूविक्रेते मोहफुलाच्या दारूची विक्री करीत होते. याठिकाणी शेजारी गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी येत होते. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था नष्ट झाली. भांडण-तंट्यांच्या प्रमाणात वाढ झाली. अशातच गावातील महिलांनी एकत्र येत मुक्तिपथ सोबत बैठक घेऊन विक्रेत्यांना नोटीस बजावले. मात्र, विक्रेत्यांनी आपले ठिकाण बदलवून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना गावकऱ्यांनी निवेदन सादर केले होते. पोलिस विभागाने दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता. यामुळे गावातील अवैध दारूविक्री मागील आठ महिने बंद होती. मात्र, आता पुन्हा मुजोर विक्रेत्यांनी दोन महिन्यांपासून आपला अवैध व्यवसाय सुरु केला आहे.
गावातील अवैध दारूविक्री पुन्हा बंद करण्यासाठी गावकरी व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी बैठकीचे आयोजन केले. यावेळी अवैध दारूविक्रीबंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. त्यांनतर सभेत गावातील दारूविक्रेत्यांना बोलावून दारूविक्री थांबविण्याची ताकीद दिली. यापुढे दारूविक्री करणार नाही, अशी हमी विक्रेत्यांनी दिली. तसेच अवैध व्यवसाय करताना आढळून आल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. बैठकीला सरपंच अर्चना मेश्राम, ग्रापं सदस्य संगीता वाढई, सुरज कोटरंगे, सुरज फ़ुलझले, गावकरी बाबुराव वाढई, उमेश सातपुते, नंदकिशोर निकोटे, कपिल दुधे, समीर वाढई, देवानंद जेंगठे, विठ्ठल कावळे, खुशाल गेडाम यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी जोगणा येथे रन फॉर मुक्तिपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील ४० युवक, युवती, महिला व पुरुष स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांनतर स्पर्धेचे रूपांतर बैठकीत करून दारूविक्री मुक्त गाव निर्माण करण्यासाठी गाव संघटना व गावकर्यांनी कशाप्रकारे कार्य करावे, यासंदर्भात मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम व सोनी सहारे यांनी मार्गदर्शन केले.
The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Al Nassr) (Real Madrid) (Real Madrid cf) (Rishabh Pant) (Happy New Year 2023) (Muktipath)