The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : महाज्योती मार्फत UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी १६ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली. सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता UPSC पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी १६ जुलै २०२३ रोजी परीक्षा आयोजीत केलेली होती. सदर परीक्षेसाठी २०२१८ उमेदवार पात्र होते त्यातील १३१८४ उमेदवारांनी महाराष्ट्रातील १०२ परीक्षा केद्रांवर तर दिल्ली येथील २ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केलेले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला सदर प्रकरणात CCTV फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने गैरप्रकाराची चौकशी करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची विनंती महाज्योती संस्थेला केलेली आहे. तसेच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील महाज्योतीकडे पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे प्राप्त अहवालानुसार महाज्योतीने UPSC प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षेत गैरप्रकार करताना विद्यार्थी आढळून आल्यास अश्या विद्यार्थ्यांवर जागेवर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सक्त सुचना महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला दिलेल्या आहेत.
UPSC प्रशिक्षणासाठी पुन्हा होणाऱ्या प्रवेश परीक्षेची दिनांक महाज्योतीव्दारे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.