– नक्षल्यांना मोठा हादरा, अत्याधुनिक शस्त्रे जप्त, मृतकाचे वरिष्ठ कमांडर असण्याची शक्यता
The गडविश्व
सुकमा, दि. २९ : छत्तीसगडच्या सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर शनिवार २९ मार्च रोजी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती असून या कारवाईमध्ये आतापर्यंत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे समजते.
सुकमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केरळापाल परिसरात नक्षलवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार 28 मार्च रोजी जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू केले. दरम्यान
संयुक्त पथक २८ मार्च रोजी शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. शनिवार २९ मार्चच्या सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या चकमकीत १६ नक्षली ठार झाल्याची माहिती आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी अत्याधुनिक शस्त्रे जप्त केली असून, यात इन्सास आणि एसएलआर रायफल्सचा समावेश असल्याचे कळते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ कमांडर असण्याची शक्यता आहे. ऑपरेशन अद्याप सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांच्या या मोठ्या विजयामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
