– गडचिरोली येथे आदिवासी समाजाचा मोर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : मागील २ वर्षाच्या कार्यकाळातच नव्हे तर भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारच्या शासन काळातही आपल्या आदिवासी समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले. मात्र तरीही काँग्रेसी विचाराच्या व मानसिकतेच्या लोकांनी नेहमीच भाजपा-शिवसेना महायुतीच्या निर्णयाच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यातूनच धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देणार अशी बोंब मारणे सुरू केले आहे. मात्र महायुतीचे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी देत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील आदिवासी समाजाच्या आक्रोश मोर्चाच्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पदभरती बाबत याचिका प्रलंबित असल्याने पेसा क्षेत्रातील पदभरती थांबलेले होती. मात्र तरीही नुकतेच शासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरती मानधन तत्वावर सुरू करण्याचा शासन निर्णय काढून तसे आदेश दिले आहेत. त्यातून अनेक स्थानिक बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या आदिवासी बांधवांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.